कराड उत्तरेत भाकरी फिरवायची वेळ आली आहे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

देवेंद्र फडणवीस; पाल येथे मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –

तव्यावरची भाकरी योग्य वेळी फिरवली नाही, तर ती करपते. असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. ते आमचे राजकीय विरोधक असले, तरी त्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. तब्बल 25 वर्षे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सर्वांगीण विकासापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या युक्तीनुसार आता कराड उत्तरची भाकरी फिरवण्याची वेळ आली असून खंडेराय – म्हाळसाईचा आशीर्वाद मनोजदादांना मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रचार शुभारंभ सभा : पाल (ता. कराड) येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार शुभारंभ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

रखडलेल्या विकासाला एकप्रकारे आम्हीही जबाबदार : 2014 आणि 2019 मध्ये कराड उत्तर मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झालेली परिवर्तनाची नांदी आम्ही ओळखू शकलो नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यामुळे येथील रखडलेल्या विकासाला एकप्रकारे आम्हीही जबाबदार आहोत. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

पाल : मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार सभेस उपस्थित अलोट जनसमुदायाला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समवेत विचारमंचावर उपस्थित मान्यवर.

धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी त्याग केला : 

दोन्हीवेळी मनोजदादा आणि धैर्यशीलदादांच्या मतविभागणीचा फायदा विरोधकांना झाल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, आता 2024 मध्ये ही चूक आम्ही सुधारली असून मनोजदादांसाठी धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी त्याग केला असून त्याला जनतेच्या साथीची जोड मिळाल्याने उत्तरेतील परिवर्तन निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

5 वर्षांत 25 वर्षांच्या बॅकलॉग भरून काढणार : उत्तरेतील शाश्वत विकासाबाबत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, टेंभू, ताकारी, उरमोडी, म्हैसाळ योजनांना निधी देऊन दुष्काळ निर्मूलन करत आम्ही सिंचनाची कामे केली. टेंभू, उंडाळे, उरमोडी, वांग – मराठवाडी आदी प्रकल्पांसाठीही मोठा निधी दिला. त्यानुसार उत्तरेत इंदोली, पाल योजनांना 100 मीटर हेड करून येतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे. उत्तरेत 990 कोटींच्या निधीतून विकासकामे आणली. जनतेने याठिकाणी कमळ फुलवल्यावर अवघ्या 5 वर्षात येथील 25 वर्षांच्या बॅकलॉग भरून काढू, असे ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात महायुतीचे सरकार येणार असून त्यामध्ये कराड उत्तरचा भागीदार असायला हवा. यासाठी जनतेने परिवर्तन करावे. कराड उत्तरच्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी देऊ, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

पाल : मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार सभेस झालेल्या नोट गर्दी.

प्रगतीच्या पाठीमागे जा : उत्तरेतील लोकप्रतिनिधींमध्ये विकास करण्याची इच्छाशक्ती नव्हती? की काम करायचे नव्हते, हे समजत नाही, अशी टीका करत खा. उदयनराजे भोसले म्हणाले, बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनाही त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी झुलवत ठेवले. आताही त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी लोकांना पकडून आघाडी केली आहे. तर दुसरीकडे लोक कल्याणाच्या विचाराने एकत्र आलेली युती आहे. त्यामुळे आपला नाकर्तेपणा दडवण्यासाठी इतरांवर चिकलफेक करत द्वेष करणाऱ्यांना जागा दाखवून प्रगतीच्या पाठीमागे जा आणि त्याच विचाराने उत्तरेत परिवर्तन घडवा.  

आता राष्ट्रवादीचा दरवाजा फोडा : सातारा जिल्ह्यात एकेकाळी गड राहिलेल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळल्याचे सांगत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, त्यांची तटबंदीही नेस्तनाबूत झाली आहे. आता मनोजदादांना निवडून देऊन राष्ट्रवादीचा दरवाजाही फोडा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. 

मी दिलेला शब्द पाळला : परिवर्तनाची आस मनात बाळगलेल्या उत्तरेतील जनतेने मतांची विभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याची मागणी आपणकडे केली असल्याचे सांगत जयकुमार गोरे म्हणाले, तसा शब्दही आपण खंडेरायाच्या साक्षीने दिला होता. मनोजदादांना कमळाचे बळ देऊन तो शब्द पाळला आहे. दुष्काळी माण – खटावचा दुष्काळी शिक्का पुसला असून कराड उत्तरमधील बहुतांशी दुष्काळी भागही सुजलाम – सुफलाम करू. 

यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेऊन सत्ता भोगली : उत्तरेत 25 वर्ष नेतृत्व करणाऱ्यांना अजूनही विकास करायचा असल्याची खिल्ली उडवत मनोजदादा घोरपडे म्हणाले, आता येथील जनता अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीला 100 टक्के घरी बसवेल. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेऊन 25 वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाला फाटा देत विविध संस्थांमध्ये ध्रुवीकरण केले. यासाठी जनतेलाही परिवर्तन हवे असल्याने आम्हीही या ठिकाणी कमळाचा आग्रह धरला. त्याला सर्व नेत्यांनी सहमती दिली.

पारदर्शक उड्डाणपूल व्हावा : उत्तरेत अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत मनोज घोरपडे म्हणाले, हणबरवाडी – धनगरवाडी योजनेचे वडिलांचे स्वप्न 25 वर्षांत लोकप्रतिनिधींना पूर्ण करता आले नाही. भाजपच्या माध्यमातून निधी आल्यावर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. धनगरवाडी योजनेचाही पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे. तसेच तारळी धरण कोपर्डे लिंक कॅनॉल व्हावा. तसेच उंब्रज येथे पारदर्शक उड्डाणपूल व्हावा, अशी मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे केली. 

जनतेला विविध योजनांचा लाभ 

शेतकऱ्यांना साडेसात एच.पी.पर्यंत विज बिल माफ केले, मोदींनी 10 हजार कोटींचा इन्कमटॅक्स माफ केला, राज्यात पुन्हा आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, महिलांना 50 टक्के सवलत दिल्याने एसटी महामंडळ फायद्यात आले, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, लाडक्या बहिणींना प्रतिमहा 2100 रुपये देणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

कमळासाठी ताकद लावली 

2014 आणि 2019 मध्ये मतांचे विभाजन झाल्याने उत्तरेत नाकर्ता आमदार निवडून आला. त्यामुळे सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकास एक उमेदवार दिला. परंतु, या ठिकाणी कमळ चिन्ह मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ताकद लावली. त्याला यश आले असून उत्ततेतील जनता आता मनोजदादांना बळ देत परिवर्तन करेल, असा विश्वास धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!