कराड उत्तरचा विकास हाच अजेंडा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शक्तीप्रदर्शनाद्वारे मनोज घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार, भाजप नेते मनोज घोरपडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

शक्तीप्रदर्शन व भव्य रॅली :

येथील कृष्णा नाक्यावरून दत्त चौकापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे समर्थकांनी रॅली काढली. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनोज घोरपडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रॅली शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर याठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज घोरपडे यांनी अभिवादन केले.

उमेदवारी अर्ज दाखल :

येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, चित्रलेखा माने-कदम, विक्रम पावसकर, भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व : मनोज घोरपडे हे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व असल्याचे सांगत माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मनोज घोरपडे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधींची विकासकामे आणली आहेत. त्यामुळेच पक्षाकडून त्यांना संधी मिळाली आहे.

तिघेही एकदिलाने काम करतील : 

मनोज घोरपडे यांनी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि आज समर्थकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती लावल्याने ते निवडून आल्यात जमा आहेत. असे सांगून उदयनराजे म्हणाले, मनोज घोरपडे, धैर्यशीलदादा कदम आणि रामकृष्णदादा वेताळ हे कराड उत्तरचे तिन्ही नेते एकत्र मिळून एकदिलाने  प्रयत्न करतील. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

धनगरवाडी – हणबरवाडी योजनेचे काम सुरू झाल्याच्या समाधान : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा बहुतांशी ग्रामीण भागाचा समावेश असलेला मतदारसंघ असल्याचे सांगत माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना उमेदवार मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मतदारसंघात धनगरवाडी – हणबरवाडी योजनेसाठी 2014 पासून निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. ते माध्यमातून सध्या या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. तसेच पश्चिम भागातील तारळी उपसा प्रकल्प, तसेच हिंगोली उपसा सिंचन योजनेतून 50 मीटर हेड ऐवजी 100 मीटर हेडपर्यंत पाणी पोहोचवण्याची योजना प्रस्तावित आहे. योजना मार्गी लागेल लागल्यास मतदारसंघातील बहुतांशी शेतीच्या पाण्याचा, तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघाचा संपूर्ण विकास हाच आमचा अजेंडा राहील.

उत्तरेतील नेत्यांच्या समन्वयातून उमेदवारी : कराड उत्तरमधील सर्व  नेत्यांच्या समन्वयातून आपल्यावर भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी दिली असल्याचे सांगत मनोज घोरपडे म्हणाले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नेते रामकृष्ण वेताळ यांच्या सहकार्याने एकदिलाने आम्ही सर्व मिळून काम करू. कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ असून याठिकाणी महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

उत्तरेत विलासकाकांचे मोठे योगदान

कराड तालुक्यासह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचे  काम मोठे आहे. त्यांना आदरस्थानी मानून आम्ही वाटचाल करत आहोत. या निवडणुकीत प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर अन्य समीकरणे समोर येथील, असे सूचक विधानही मनोज घोरपडे यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे काय असतील? याचा अंदाजही राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!