आ. बाळासाहेब पाटील यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, अर्ज दाखल
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
जोरदार शक्तीप्रदर्शन :
आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली. या रॅलीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शिवतीर्थ चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित जनसमुदाय लिबर्टी मैदान येथे होणाऱ्या सभास्थळी रवाना झाला.
उमेदवारी अर्ज दाखल :
येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासावर आधारित राजकारण करण्यावर भर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनेक वर्ष मला सहकार्य केल्याच्या सांगत आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, याठिकाणी विकासावर आधारित राजकारण करण्यावर आपला नेहमीच भर राहिला आहे. सहकार व पणनमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण मतदारसंघात अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.
मतदारसंघात जातीवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न :सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा जिल्हा असल्याचे सांगत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही आपण यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसारच राजकीय वाटचाल करत आहोत. मतदारसंघात विरोधकांकडून जातीवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, ही विचारांची लढाई असून येथील सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.