ज्युनिअर वर्ल्ड कपमधील राजवर्धनचे यश प्रेरणादायी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे; कराडकर नागरी गौरव समितीकडून रॅली व गौरव

कराड/प्रतिनिधी : – 

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशनकडून दक्षिण अमेरिकेतील पेरू (लिमा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर चॅम्पियनशिप रॅपिड फायर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक मिळविणार्‍या भारतीय नेमबाजी संघातील राजवर्धन अशुतोष पाटील याचे यश प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी काढले.

कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिटर : कराडचा सुपूत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू राजवर्धन पाटील यांची कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिटर म्हणून निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढवा आणि देशाचा नावलौकिक वाढविणार्‍या राजवर्धन पाटील यांचा यथोचित सन्मानासाठी शुक्रवारी सायंकाळी कराड शहरातून रॅली काढण्यात आली. यानंतर सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात कराडकर नागरी गौरव समिती व निवडणूक आयोगाकडून गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, प्राचार्य मोहन राजमाने, रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य अ‍ॅड. रविंद्र पवार, कराड उत्तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कराड दक्षिण स्मिता पवार, मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांची यावेळी प्रमख उपस्थिती होती.

कराडचाच नव्हे; देशाचा बहुमान : राजवर्धन पाटील याने मागील आठ वर्ष प्रचंड कष्ट घेत सराव सुरू ठेवला असल्याचे सांगत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, राजवर्धनला अशुतोष पाटील यांच्यासह कुटूंबियांकडून पाठिंबा मिळाला असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या राजवर्धन पाटीलने सांघिक यश मिळवित गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. हा केवळ कराडचाच नव्हे; तर राज्याचा आणि देशाचा बहुमान आहे.

मतदानाचा टक्का नक्की वाढेल : राजवर्धन पाटीलला ब्रँड अ‍ॅम्बेसिटर करून निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे निश्चित मतदानाचा टक्का वाढविण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राजवर्धन पाटील यांच्या यशापासून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही श्री. म्हेत्रे यांनी केले.

युवा पिढीने अभ्यासासह खेळाकडे लक्ष द्यावे : राजवर्धन पाटील याने मिळविलेल्या यशाचे कौतुक करत मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे म्हणाले, युवा पिढीने मोबाईलपासून दूर रहावे. मोबाईलचा स्क्रिन टाईम कमी करून तो अभ्यास आणि खेळासाठी वेळ दिल्यास यश मिळविणे सहजशक्य होईल. 

जिद्द व चिकाटीमुळे यश मिळतेच : प्राचार्य मोहन राजमाने यांनी राजवर्धन पाटील याने कराडसह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढविला आहे. या यशामुळे जिद्द व चिकाटी कायम ठेवल्यास यश मिळतेच, हे राजवर्धन पाटील याने दाखवून दिल्याचे सांगितले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते गौरव : प्रारंभी, कराडकर नागरी गौरव समितीकडून अशुतोष पाटील, नयन पाटील यांच्यासह राजवर्धन यांच्या आजी – आजोबा, तसेच महेंद्र भोसले यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार युवराज पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, प्रशासन अधिकारी नितीन जगताप, विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, नोडल अधिकारी सौरभ करपे, प्रतिभा लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक नोडल अधिकारी महेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहाय्यक नोडल अधिकारी आनंदराव जानुगडे, सुनिल परीट यांनी केले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!