साडेपंधरा तोळे सोने जप्त; कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
कराड/प्रतिनिधी : –
आगाशिवनगर (मलकापूर) येथील अयोध्यानगर आणि शास्त्रीनगर येथे सप्टेंबर 2024 मध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. या घरफोडीचा छडा लावण्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे. तसेच या कारवाईत त्याच्याकडून सुमारे सव्वा अकरा लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता.जि. विजापुर, राज्य कर्नाटक) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
सप्टेंबरमध्ये घडला होता घरफोडीचा प्रकार :याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आगाशिवनगर (मलकापूर) येथील अयोध्यानगर आणि शास्त्रीनगर येथे सप्टेंबर 2024 मध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि अशोक भापकर व त्यांचे पथक तपास करीत होते.
संशयीताकडून घरफोडी केल्याची कबुली : सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयांमधील संशयितास मिरज (सांगली) येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता आरोपी परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता.जि.विजापुर राज्य कर्नाटक) याने मलकापूर व आगाशिवनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यास अटक करण्यात आली असून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त :सदर गुन्हयात चोरीस गेलेले एकूण 11 लाख 16 हजार रुपये किंमतीचे सुमारे 15.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपीकडून अन्य काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
कामगिरीत सहभाग : सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, मसपोनि श्रध्दा आंबले, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, निखिल मगदुम, पो. हवा. शशि काळे, अमित पवार, अशोक वाडकर, पो.ना. अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, पो.शि. अमोल देशमुख, धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.