कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आम्ही विद्यार्थी आता मतदार नाही. परंतु, आता मतदार असलेल्या सर्वांना आमची विनंती आहे की, तुम्ही आता शंभर टक्के मतदान करा. आम्ही भविष्यात तुमचा वारसा म्हणून शंभर टक्के मतदान करू, असे आवाहन मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सर्व मतदारांना केले.
मतदान न करणाऱ्यांमध्ये श्रीमंत, व्यापारी, नोकरदारांचा सामावेश : भारतामध्ये जगातील सर्वोत्तम लोकशाही नांदत आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार मिळालेल्या प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. परंतु, आपल्या देशामध्ये लोकसभेला सरासरी 55 ते 60 टक्केच मतदान होते. तसेच विधानसभा निवडणुकांसाठी 60 ते 65 टक्क्यांपर्यंतच मतदान होते. याचाच अर्थ 35 ते 40 टक्के लोक मतदान करत नाहीत .मतदान न करणाऱ्यांमध्ये श्रीमंत व्यापारी, नोकरदार वर्गाचा जास्त समावेश असल्याचे दिसून येते, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
मतदान न करण्याचे तोटे : विद्यार्थी आपल्या भाषणातून मतदान न करण्याचे तोटे सांगताना म्हणाले, शंभर टक्के मतदान न झाल्यामुळे अयोग्य उमेदवार निवडून जातात. लोकशाहीबद्दल आस्था नसणारे भ्रष्ट व गुंड लोक जास्त प्रमाणात निवडून येतात. अभ्यास नसणारे व महाराष्ट्रातील, समाजापुढील प्रश्न व समस्यांची जाण नसलेले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जातात. याशिवाय इतर बरेच तोटे आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की, आता तुम्ही मतदान करा; आम्ही मतदार झाल्यावर नक्कीच शंभर टक्के मतदान करू.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक भरत बुरुंगले, संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.