शिक्षण मंडळ कराड संचालित ‘कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंटमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन हेअर अँड ब्युटी’ या अभ्यासक्रमाचा शुभारंभ व तसेच मागील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नाटक व दूरदर्शन मालिकेतील अभिनेत्री दया श्रीनिवास एकसंबेकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य देणारी संस्था :शिक्षण मंडळ कराड संचालित कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट 21 व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य देणारी, तसेच महिलांना आत्मनिर्भर बनवणारी, महिलांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असणारी संस्था आहे. त्यामुळे महिलांनी अशा अभ्यासक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन दया एकसंबेकर यांनी केले.
शिक्षणाची वेगवेगळी कवाडे खुली करण्यासाठी कटिबद्ध :नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सुद्धा यावेळी झाला. अध्यक्षीय मनोगतात पारंपरिक औपचारिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकासासाठी अनौपचारिक शिक्षणाची वेगवेगळी कवाडे खुली करण्यास शिक्षण मंडळ, कराड कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिक्षण मंडळ, कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती : महिला महाविद्यालय कराडच्या प्रभारी प्राचार्या स्नेहल प्रभुणे, कृष्णाकाठ इन्स्टिट्यूटचे संचालक सुधीर कुलकर्णी, मुख्य प्रशिक्षक शीतल ढेरे, नारीशक्ती प्रभाग संघाच्या अध्यक्षा वैशाली थोरात, नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी, पालक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.