विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशितपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर एकूण 15 जणांनी 23 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. तसेच 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकूण 25 जणांनी 30 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत.
कराड उत्तरेतून अपक्ष उमेदवारी :259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिकराव दिनकर पवार रा. गोटे (ता. कराड) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर पहिल्या दिवशी 15 जणांनी एकूण 23 नामनिर्देशनपत्रे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख व अनिकेत पाटील यांनी दिली.
दक्षिणसाठी 25 जणांनी घेतले 30 अर्ज : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकूण 25 जणांनी 30 नामनिर्देशनपत्रे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार युवराज पाटील यांनी दिली.
पक्षनिहाय अर्जांची आकडेवारी : कराड दक्षिणमधून पहिल्या दिवशी झालेल्या अर्जांच्या विक्रीबाबत पक्षनिहाय माहिती सांगताना श्री. म्हेत्रे म्हणाले, खुल्या प्रवर्गातील 12, अनुसूचित जातीतील 13, अनुसूचित जमाती 0, अपक्ष उमेदवार 14, पक्षीय उमेदवार 11 इ. जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 1 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून (मायावती) 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टीकडून 1 अर्ज, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून 1, अपक्ष -11 अर्ज असे एकूण 30 अर्ज खरेदी केले आहेत.