कराड/प्रतिनिधी : –
टेंभू (ता. कराड) येथे चैतन्य प्रसाद मोफत वाचनालय व थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कराड जलशुद्धीकरण केंद्राचे अभियंता सुहास इनामदार यांचे ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर व्याख्यान झाले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक फैय्याज संदे होते. यावेळी चैतन्य प्रसाद मोफत वाचनालयाचे अध्यक्ष शामराव नांगरे, बाळकृष्ण कदम, दादासो पाटील, शाहीर नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचनाने माणूस अजरामर होतो : विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत, असे सांगताना श्री. इनामदार म्हणाले, वाचनाने माणूस अजरामर होतो. वाचनाने मनुष्याच्या ज्ञानात भर पडते. जी गोष्ट आपल्या आयुष्यात सकारात्मक विचार घडवते त्याचेच वाचन आपण केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा वाचनामधील रस कमी होत चालला आहे. विद्यार्थी हा सोशल मिडियाच्या दुनियेत हरवत चालला आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडायला हवे आणि पुस्तकाच्या दुनियेत रमायला हवे.
यावेळी हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नागरगोजे सर यांनी केले. तर दादासो पाटील यांनी आभार मानले.