कराड दक्षिण मतदारसंघात पुन्हा इतिहास घडवूया

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. पृथ्वीराज चव्हाण; कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यास प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

निवडणुकीत पैशाचा वापर होईल. खोटी आश्वासने दिली जातील. परंतु, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपला बूथ जिंकावा. मुख्यमंत्री कार्यकाळात 1800 कोटी पेक्षा जास्त निधी मतदारसंघात म्हणून विकास केला. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने विरोधकांच्या निधीला कात्री लावली. मात्र, आता राज्यात आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील खूण असून यामध्ये आपला सर्वांचा सहभाग असण्यासाठी कराड दक्षिण मतदारसंघात पुन्हा इतिहास घडवूया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

50 हजारांचे मताधिक्य देण्याचा निर्धार :

कराड येथे कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा, तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराजबाबांच्या विजयासाठी देण्याचा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. 

मान्यवरांची उपस्थिती : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अजितराव पाटील – चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, पै. नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपने काँग्रेसच्या योजना पळवल्या : कर्नाटक व आंध्रमध्ये काँग्रेसने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपये दिले. महायुतीने महाराष्ट्रात त्याच योजनेचे नाव बदलून लाडकी बहिण केल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, ही योजना टिकण्यासाठी त्यांनी कोणताही कायदा केलेला नाही. मात्र, राज्यात आता महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून महिलांना दीड ऐवजी दोन हजार रुपये, मोफत प्रवास, मुलींना सायकल आणि अन्य योजनांचा लाभही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दक्षिणचा ‘न भूतो न भविष्यती’  विकास करणार :

येथील जनतेने मला 1991 ला आशीर्वाद दिल्याने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघासाठी तब्बल 1600 कोटींची कामे करता आल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, आता कराड तालुक्यात स्थानिक युवकांना याच ठिकाणी रोजगार उपलब्धीसाठी आयटी हबची निर्मिती करण्याचा मानस असून येथील जनतेने संधी दिल्यास कराड दक्षिणचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

पुरोगामी महाराष्ट्राचा पाया उध्वस्त करण्याचे काम : देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवून, समाजात तेढ निर्माण करून यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया उध्वस्त करण्याचे काम काही प्रवृत्ती करत असल्याचे सांगत उदयसिंह पाटील म्हणाले, कराड दक्षिणमध्येही हे काम सुरू आहे. हे आपण ओळखले पाहिजे. विलासकाकांनी नेहमी समाज, संघटना हिताचे काम केले. त्यांनी अनेकांना मदत केली. परंतु, सत्तेत गेल्यावर त्यांच्या रक्तात सरंजामशाही, भांडवलशाही भिनली. वाम मार्गाने मिळालेल्या पैशातून त्यांना माणसं, सत्ता विकत घ्यायची असल्याचा आरोपीही त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला. 

मान्यवरांचे मनोगत : प्रास्ताविक कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. यावेळी बंडानाना जगताप, भानुदास माळी, फारूक पटवेकर, आबा सूर्यवंशी, अॅड. अमित जाधव, शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर यांची भाषणे झाली. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले. या मेळाव्यास कराड दक्षिणमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, नागरिक, महिलांची मोठी उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण : – 

  • दक्षिणेत प्रतिगामी विचार रुजू देऊ नका

  • लोकसभेत जनतेने भाजपला नाकारले. महाराष्ट्रात भाजपचे खासदार 23 वरून 9 वर आलेत.

  • मोदींनी कराड-चिपळूण रेल्वेचा निधी बुलेट ट्रेनसाठी पळवला.

  • महागाईचा भडका उडाला आहे. सोयाबीन, कापूस, कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

  • कराडच्या स्टेडियमसाठी 100 कोटींची घोषणा. परंतु, प्रत्यक्षात 10 लाखांचीच तरतूद आहे.

  • महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तात्काळ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार.

  • महामार्ग, रेल्वे, विमानतळ या सुविधांसोबत कराडला आयटी हब उभारणार.

काकांच्या विचारांचा आणि संघटनेचा वारसा जपणार 

आज अनेकजण विचारतात, या निवडणुकीत रयत संघटनेची भूमिका काय राहणार आहे. खरेतर, काका-बाबा यांच्यात वैचारिक मतभेद होते, मनभेद नव्हते. परंतु, काहींकडून याचे भांडवल केले जात आहे. मात्र, आपणही काकांकडून मिळालेल्या वैचारिक वारशाची प्रतारणा होऊ देणार नाही. रयत संघटना शब्दाला बांधील आहे. राज्यात परिवर्तन अटळ असून यामध्ये कराड दक्षिणचा सहभाग होण्यासाठी पृथ्वीराजबाबांना सर्वांनी साथ द्या, असे आवाहनही उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी यावेळी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!