ब्राह्मण समाजाचे आर्थिक परिवर्तन घडवणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आशिष दामले; दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊ 

कराड/प्रतिनिधी : – 

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितले.

शिवतीर्थावर अभिवादन : महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले प्रथमच कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्ती व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सोनल भोसेकर, भाजप पदाधिकारी मुकुंद चरेगावकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

युती सरकारने न्याय दिला : इतर समाज घटकांप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी, ही अनेक वर्षांची ब्राह्मण समाजाची मागणी असल्याचे सांगत श्री. दामले म्हणाले, युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळावर माझी अध्यक्षपदी नियुक्ती करत मला कमी वयात काम करण्याची संधी दिली असून या संधीचे कामाच्या माध्यमातून सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार : ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा माझा मानस असल्याचे सांगत श्री दामले म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबई या ठिकाणी येत असतात. परंतु, अशा मोठ्या शहरांमध्ये त्यांची राहण्याची मोठी गैरसोय होते. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वसतिगृह उभारण्याचा संकल्प आपण केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!