भिमराव पाटील यांची माहिती; पक्षाच्यावतीने केली उमेदवारीची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचेच चार उमेदवार आपापली दावेदारी सांगत आहेत. मात्र, धैर्यशील कदम यांनी मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत आणलेला कोट्यावधींचा निधी, त्यांचा दांडगा जनसंपर्क, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा, सक्षम मतगठ्ठा आणि मतदारसंघातील पोषक वातावरण पाहता तेच खरे कराड उत्तरचे दावेदार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडून धैर्यशील कदम यांनाच अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील यांनी कराड उत्तर भाजपच्या वतीने केली.
मान्यवरांची उपस्थिती : बनवडी (ता. कराड) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंकरराव शेजवळ, सागर शिवदास, संपतराव माने, राजेंद्र चव्हाण, पृथ्वीराज निकम, दिपाली खोत, सीमा घार्गे, महेश घार्गे, नविन जगदाळे, श्रीकांत पिसाळ, सुमित शहा, विलास आरवडे, अविनाश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अन्यथा, उत्तरमध्ये परिवर्तन झाले असते : धैर्यशील कदम यांच्यावर आतापर्यंत झालेल्या अन्यायाबाबत बोलताना श्री. पाटील म्हणाले, 2009 च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून धैर्यशील कदम यांना मिळणारे तिकीट ऐनवेळेला खा. उदयनराजे भोसले यांच्या आग्रहास्तव डॉ. अतुल भोसले यांना देऊन माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 2014 मध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. तेव्हा धैर्यशील कदम यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अंतर्गत विरोध झाला. तर 2019 च्या निवडणुकीत भाजपसाठी चांगले वातावरण होते. परंतु, मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने धैर्यशील कदम यांना महायुतीच्या माध्यमातून सेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली. परंतु, ऐनवेळी मनोज घोरपडे यांनी बंडाळी केल्याने चांगली संधी हुकली. अन्यथा, 2019 मध्येच कराड उत्तरमध्ये परिवर्तन झाले असते, असे ठाम मतही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
उत्तरेतून चार उमेदवार इच्छुक : सध्या कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचे नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, आणि मी स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत श्री. पाटील म्हणाले, या मतदारसंघावर महायुतीतील घटक पक्षानेही आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाकडे गेला, तरीही पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही निष्ठेने काम करू. तसा शब्द आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. मात्र, भाजपचे नेते धैर्यशील कदम त्यांच्यावर 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकांवेळी अन्याय झाला आहे. त्यांनी आतापर्यंत भाजपच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे खेचून आणली असून येथील उमेदवारीवर त्यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील जनतेचा कौल घेऊन खरी परिस्थिती जाणून घेत धैर्यशील कदम यांना कराड उत्तरमधून भाजपची अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कराड उत्तर भाजपकडेच राहण्याचा विश्वास
सातारा जिल्ह्यात महायुतीला पोषक वातावरण निर्माण झाले असून भाजपला चार, शिवसेनेला (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादीला (अजितदादा गट) दोन असे जागावाटप झाले आहे. दरम्यान, फलटणची जागा गेल्याने अजितदादांनी कराड उत्तरवर आपला दावा सांगितला आहे. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला आहे. तसेच येथील अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त अन्य इच्छुकांचाही मानसन्मान केला जाईल, असेही ना. फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती माध्यमांचे प्रश्नावर बोलताना धैर्यशील कदम यांनी दिली.
2014 पासून आतापर्यंत पक्षाच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये कोट्यावधींची विकासकामे केली आहेत, हे जनतेला ही माहिती आहे. त्यामुळे आपली येथील उमेदवारीवर दावेदारी आहेच. तसेच अन्य तीन उमेदवारही इच्छुक आहेत. परंतु, महायुतीच्या घटक पक्षाकडे हा मतदारसंघ गेल्यास आम्ही पक्ष देईल त्या उमेदवाराचे निष्ठेने काम करू. मात्र, मी भाजप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही चिन्हावर कदापिही निवडणूक लढवणार नाही.
– धैर्यशील कदम (सातारा जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी)