राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे. यामध्ये जागा वाटपाबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करत आहेत. आतापर्यंत 288 जागांपैकी 200 जागांवर एकमत झाले असून बाकीच्या जागांबाबत आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती होती.
सरन्यायाधीशांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह :सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, न्याय देवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून न्याय देवतेच्या हातात तराजू ऐवजी संविधान देण्यात आल्याची बाबही चांगली आहे. सरन्यायाधीश यांनी घेतला हा निर्णय अत्यंत योग्य असून देशात असा निर्णय कधीच झाला नसता, तो त्यांनी घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जरांगेंचा निर्णय झाल्यावर बोलू :मनोज जरांगे-पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या निर्णयाबाबत शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यात विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यांचा ठाम निर्णय झाल्यानंतरच यावर बोलणे उचित होईल.
पिपाणीचा फटका न बसण्याची अपेक्षा :सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे झालेल्या नुकसानीबाबत ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे चित्र स्पष्ट नव्हते. परंतु, यावेळी विधानसभा निवडणुकीत ते चित्र अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांमध्ये गफलत न होता पिपाणीचा कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही, अशी आपण अपेक्षा करूया, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोणी भेटायला घ्यायचे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न :बबनदादा यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याबरोबरच अन्य कारणांसाठीही अनेकजण भेटायला येत असतात. त्यामुळे कुणी भेटायला आलं, तर आपण काय करणार?. बबनदादा कित्येक वर्ष आमच्या सोबत आहेत. आमच्याच विचाराने ते आमदार झालेत. त्यांनी जी भूमिका घेतली होती, त्यामुळे जनतेत नाराजी होती. परंतु, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी, आमच्यातला सलोखा काही संपत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री… निकालानंतर बघू :महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्षांची प्रेस झाल्यानंतर हा विषय संपुष्टात येईल. तसेच मुख्यमंत्री पदावर आपला दावा आहे का? यावर ते म्हणाले, आधी निवडणुकीचा निकाल तर लागू द्या. मग त्या संदर्भात बोलू.
माझ्यावर जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी :प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक होणार असून त्यामध्ये जागा वाटपाबाबतचे सूत्र ठरवण्यात येईल. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी आहे. तसेच बाहेरील पक्षातून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु, आमच्याकडे अनेक चांगले तरुण चेहरे असून त्यांना आम्ही प्राधान्याने संधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.