श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
कराड/प्रतिनिधी : –
कराडनगरीचे ग्रामदैवत श्री दैत्यनिवारिणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश 14 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.
कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून पुराणात उल्लेख : कराडनगरीचा उल्लेख पुराणामध्ये कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून करण्यात आला आहे. कराड शहराच्या पश्चिमेस कोयना नदीकाठी श्री दैत्यनिवारिणी देवीचे मंदिर आहे. दैत्यांचा नाश करणाऱ्या श्री दैत्यनिवारिणी देवीची अष्टभुजा मूर्ती असून, याठिकाणी दरवर्षी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. नदीकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून भाविक व कराडवासीयांमधून होत होती.
शासनस्तरावर पाठपुरावा :
याबाबत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत, भाविकांची ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. या मागणीची दखल घेत, महायुती सरकारने ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे’ या योजनेअंतर्गत श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.
मंदिराची सुरक्षितता जपण्यास होणार मदत :कराडच्या ऐतिहासिक श्री दैत्यनिवारिणी मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाल्याने, मंदिराची सुरक्षितता जपण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल महायुती सरकारचे आणि डॉ. अतुल भोसले यांचे कराडवासीयांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.