राजेंद्रसिंह यादव यांचे प्रतिपादन; 209 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरातील पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी तब्बल 209 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसह अन्य विकासकामांचे आज भूमिपूजन होत आहे. कराडनगरीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी विकासकामांची गंगा शिवसेनेच्या माध्यमातून वाहत असून कराड शहराच्या विकासामध्ये हा एक मायलस्टोन ठरेल, असा विश्वास यशवंत विकास आघाडीचे गटनेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन : येथील नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख श्री. कणसे, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, अभियंता आर. डी. गायकवाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
209 कोटींचा विकासनिधी :
याप्रसंगी बोलताना श्री. यादव म्हणाले, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कराड शहरातील पाणीपुरवठा योजनेसह अन्य विकासकामांसाठी तब्बल 209 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम खासदार श्रीकांत शिंदे, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते होणार होता. परंतु, ऐन वेळच्या कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. आजच्या नियोजित पुढील कार्यक्रमप्रसंगी ते आपणा सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत.
कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू : श्री. यादव म्हणाले, कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने घाईगडबडीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात येत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर ही कामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर त्याचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हनुमंतराव पवार नगरसेविका स्मिता हुलवान, सुधीर एकांडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील
आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून किती जागा लढवण्यात येणार आहेत? या प्रश्नावर श्री. यादव म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात किती व कोणकोणत्या जागा लढवायच्या, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तसेच कराड विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक आहात का? या प्रश्नावरही त्यांनी स्मितहास्य करत पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.