कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागामध्ये वाचनालय उभे राहणे गरजेचे आहे. वाचनालयाचे गावातील लोकांच्या ज्ञानसंवर्धनासाठी, सामाजिक प्रगतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी एक महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
कोळे (ता. कराड) येथील युथ फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ज्ञानसंपदा वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन भिलारे, प्रमुख उपस्थित डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. सौ. हर्षाली पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. मानसिंग राजे होते.
वाचनालय निर्मिती हे मोठे योगदान : गावातील लोकांसाठी वाचनालय निर्माण करणे हे आजच्या काळातील महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून महेश देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा अनेकदा कमी असतात. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना शैक्षणिक साधने मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वाचनालये ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्ञान आणि माहितीचा महत्त्वाचा स्त्रोत ठरत आहेत. विद्यार्थ्यांना वाचनालयांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साधने आणि पुस्तके उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होत आहे.
श्री. भिलारे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यास मदत होत असल्याचे सांगितले. डॉ. मानसिंग राजे यांनी वाचनालये केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातही मोलाची भूमिका बजावतात. अनेकदा ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा मर्यादित असल्यामुळे वाचनालय ही ज्ञान आणि माहिती मिळवण्याची एकमेव जागा ठरत असल्याचे सांगितले. प्रभाकर देसाई यांनी आपल्या मनोगतातून वाचनालये ही सांस्कृतिक गरज असल्याचे नमूद केले.
प्रा. डॉ. सागर लटके-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विलास सपकाळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनिल लोकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर संदे, उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव प्रा. डॉ. सागर लटके-पाटील, खजिनदार बबन सपकाळ व सर्व सदस्यांनी केली. यावेळी सरपंच श्रीमती लतिफा अमानुल्ला फकीर, उपसरपंच सुधीर कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.