प्रा. दीपक देशपांडे; शारदीय व्याख्यानमाला पुष्प नववे, कराडकर रसिकश्रोते हास्यकल्लोळात बुडाले
कराड/प्रतिनिधी : –
हास्य हे माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असून हास्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढते. जशी मैला मैलावर भाषा बदलते, तसेच हास्याचे प्रकारे बदलतात. त्याचबरोबर प्रत्येक भाषा आणि त्यातील उच्चारातूनही अनेक गमती-जमती घडत राहतात, असे सांगून प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या आवाजावर अवलंबून असते, असे मत झी मराठी वृत्तवाहिनीचे पहिले हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत शुक्रवार, दि. 10 रोजी शेवटचे नववे पुष्प गुंफताना ‘हास्यकल्लोळ’ या विषयावर त्यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, प्रशांत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बसस्थानकावरील अनाउन्सरला श्रोत्यांची दाद :
या एकपात्री प्रयोगात सुरुवातीला त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांतील संवाद, तसेच पोलिसांमधील आवाजातील गमतीजमती सादर केल्या. तसेच बस स्थानकावरील अनाउन्सरच्या सादर केलेल्या विशिष्ट पट्टीतील हुबेहूब आवाजाला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्याचबरोबर विमानतळावर विविध देशांतील स्थानिक भाषेत होणारी अनाउन्समेंट सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. आकाशवाणीवरील निवेदन, विविध कार्यक्रम, फोनवरील गमतीशीर संभाषण आणि रॉंग नंबरचा मजेदार काल्पनिक किस्साही त्यांनी रसिकांसमोर सादर केला. त्यालाही चांगली दाद मिळाली.
सोलापुरी माणसांचा फोनवरील गमतीशीर संवाद : सोलापुरी आवाजामुळे घडणाऱ्या गमती सांगत प्रा. देशपांडे यांनी सोलापुरी माणसांचा फोनवरील गमतीशीर संवाद, शहरी आणि ग्रामीण भागातील काही शब्दांचा उच्चार, वारंवार उच्चारले जाणारे शब्द आणि त्यातून होणारे विनोद सादर केले.
श्रीराम लागू आणि निळूभाऊंवर टाळ्यांचा कडकडाट :
तेलगू आणि कानडी भाषा, त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी भाषेतील शब्दांच्या उच्चारांमुळे होणाऱ्या गमती व पुणेरी माणसांचे मजेशीर संवाद प्रा. देशपांडे यांनी सादर केले. तसेच जुन्या मराठी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये तार स्वरूपात असलेले नायक आणि नायिकांचे आवाज, दिग्गज अभिनेते दिवंगत डॉ. श्रीराम लागू, तसेच जगभरात मराठी चित्रपटातील खलनायक म्हणून ओळख निर्माण केलेले निळूभाऊ फुले यांचे आवाज सादर केले. यावेळी रसिक श्रोत्यांनी टाळांच्या कडकडाटात उस्फूर्तपणे दाद दिली. तसेच कानडी चित्रपटातील आवाजाच्या गमतीजमतीही त्यांनी सादर केल्या.
‘सांग सांग भोलानाथ’ला इटालियन साज : तेलगू चित्रपटातील देवदास आणि पारो यांच्यातील आवाजामुळे गमतीशीर ठरणारा प्रेमसंवाद, दक्षिणात्य व हिंदी चित्रपटातील फायटिंगच्या गमती, शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या संवादाच्या गमती, मिथुन चक्रवर्ती यांच्या सिनेमातील फायटिंगच्या भन्नाट कल्पना त्यांनी सादर केल्या. तसेच इंग्रजी सिनेमांतील गाण्यांच्या आवाजातील विशिष्ट टोन, ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे सर इटालियन गायकांनी गायले असते, तर त्यातून निर्माण होणार विनोद, तसेच पॉप सिंगरने जर काही मराठी गाणी गायली, तर त्यातून कशा गमतीजमती निर्माण होतील, त्याचबरोबर जात्यांवरील बायकांच्या गाण्यांचेही त्यांनी यावेळी मजेशीर सादरीकरण केले. त्यालाही रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात उत्स्फूर्तपणे दाद दिली.
बडबड गीते आणि बालगीते : ऑर्केस्ट्रामधील एकच कलाकार स्त्री आणि पुरुषाचा काढत असलेला आवाज, ‘नाच रे मोरा’ हे गाणे जर पोवाडा स्वरूपात गायले, तर काय गंमत येईल, याचे उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी केले. लहान मुलांनी बोबड्या बोलीत गायलेली बडबड गीते, बालगीते सादर करत टीव्हीवर लागणाऱ्या काही जाहिरातींमधील गमती जमती त्यांनी सांगितल्या आणि दक्षिण भारतातील शास्त्रीय संगीतकार पंडित हृदयनाथ व पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात सध्याची काही चित्रपटांमधील गाणीही वेगळ्या पद्धतीने त्यांनी सादर केली.
राजकीय दिग्गज नेत्यांची मिमिक्री : अनेक राजकीय दिग्गज नेत्यांचा हुबेहूब आवाज त्यांनी सादर केले. यामध्ये एखादे सुरू असलेले भाषण हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहे; हे कसे ओळखायचे, हेही त्यांनी आवाजावरील चढउतारावरून सांगितले. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचे हुबेहूब खूप आवाज सादर केले. याला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तसेच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सचिन तेंडुलकरचे शतक झाल्यावर प्रतिक्रिया कशी दिली असती, याचे गमतीशीर सादरीकरण केले. वृत्तवाहिन्यांवरील महाचर्चांमध्ये बोलत असताना किरीट सोमय्या, सभागृहातील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण, अण्णा हजारे यांच्या आवाजातील हिंदी आणि मराठी भाषेतील संवादाच्या गमती, तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा हुबेहूब आवाज सादर केला. तसेच सचिन तेंडुलकर यांचे महाशतक झाल्यावर पवार साहेबांनी त्यांच्या आवाजात व भाषाशैलीत कशी प्रतिक्रिया दिली असती, याचे गमतीशीर सादर करून भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी पुणे येथील भाषणात प्रभू श्री राम यांच्यावर बोलतानाचा संवाद त्यांनी सादर करून उपस्थितांची मनी जिंकली. त्यांच्या या कलाकारीला उपस्थित रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकंदरीत प्रा. देशपांडे यांनी सादर केलेल्या या एकपात्री विनोदी प्रयोगात कराडकर रसिक श्रोते आकंठ बुडालाचे दिसून आले.
हास्यसम्राटने एकपात्री कलाकारांना व्यासपीठ दिले
झी मराठी या वृत्तवाहिनीवरील हास्यसम्राट कार्यक्रमाने अनेक एकपात्री कलाकारांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचा पहिला हास्यसम्राट होण्याचा बहुमान मला मिळाला. हास्यसम्राटने एकपात्री कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले. आज मी जगभरात जवळपास सव्वातीन हजारांपेक्षा जास्त एकपात्री प्रयोग केले असून यातून रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत हल्लीच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना विरंगुळा दिल्याचे समाधान मिळते, असे मत प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केले.
कराडच्या भूमीत मोठे कर्तृत्व
कराडची पावन भूमी सर्वार्थाने समृद्ध आहे. या भूमीने महाराष्ट्राला अनेक संत, साहित्यिक, समाजकारणी, राजकारणी आणि दर्जेदार कलाकार दिलेत. यशवंतराव चव्हाण हेही एक साहित्यिक आणि थोर राजकारणी होते. त्यामुळे कराडच्या भूमीत मोठे कर्तुत्व आहे, असे गौरवोद्गार काढत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या या राज्यातील मोठ्या व्यासपीठावर, तसेच तब्बल 92 वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञात कराडकर रसिक श्रोत्यांसमोर माझी कला सादर करण्याचा दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल त्यांनी आयोजक व संयोजकांचे आभारही मानले.