राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये सोमवारी (दि. 14) रोजी भव्य महिला महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत विकास आघाडी, जिजाई महिला मंच आणि उद्योग समूह यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात आले आहे. सौ. रुग्वेदिका राजेंद्रसिंह यादव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध स्पर्धा व सन्मान सोहळा :
या कार्यक्रमात पाक कला स्पर्धा, मिस कराड, होम मिनिस्टर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया, नारी सन्मान सोहळा, महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारी शक्ती सन्मान अंतरंग अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून त्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येक महिलेला हमखास भेटवस्तू देण्यात येणार आहे. अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे.
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, बिग बॉस उपविजेता धनंजय पोवार, रिल स्टार रवी दाजी, अभिनेते वासू पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नाव नोंदणी आवश्यक :शनिवार पेठेत यशवंत हायस्कूलच्या पाठीमागे लल्लूभाई मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्रसिंह यादव यांनी केले आहे.
राजेंद्रसिंह यादव शक्तिप्रदर्शन करणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्रसिंह यादव कराडमध्ये भव्य महिला मेळावा आयोजित करत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पेरणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या मेळाव्यात यादव काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.