दहा वर्षांत महाराष्ट्रात नवा उद्योग आला नाही : सद्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात उद्योगस्नेही वातावरण नसून, मागील दहा वर्षांत एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. याउलट राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात आले. उद्योग न आल्याने बेरोजगारी वाढली आहे.
मराठा-ओबीसी संघर्ष व्हावा, अशी काहींची इच्छा : ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष व्हावा, अशी काहींची इच्छा आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले असून, मतांच्या राजकारणासाठी हे सर्व सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले.
काँग्रेसला राहुल गांधींसारखा लढवय्या नेता मिळाला : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अविस्मरणीय होती. त्यांच्या रूपाने काँग्रेसला लढवय्या नेता मिळाला. इंडिया आघाडीमुळे मतविभाजन टाळण्यात यश आल्याने लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव करता आला.
भ्रष्ट आमदारांना जाब द्यावा लागणार : दोन वर्षांपूर्वी पर्यायी सरकार स्थापन करून 40 आमदार वेगळे होऊन हे बेकायदेशीर सरकार निर्माण झाले. आता भ्रष्ट कारभार जनता पाहत आहे. या भ्रष्ट आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत जाब द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री असताना राज्य शिखर बँकेत गैरप्रकार झाले होते. तेथे मी संचालक मंडळ बरखास्त केले. त्यामुळे 1100 कोटी रुपयांच्या तोट्यात असलेल्या बँकेचा दोन वर्षांत तोटा भरून काढत 700 कोटी रुपयांच्या फायद्यात आणली. सहकार चळवळ वाचविण्याचे हे पहिले पाऊल होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे समाधान : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याची प्रेरणा मला पंतप्रधान कार्यालयात काम केल्यामुळे मिळाली. व मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रश्न हाती घेतला. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यामुळे आम्ही सुरू केलेले काम पूर्ण झाल्याचे मला समाधान आहे.
लाडकी बहीण योजना काँग्रेसने सुरू केली : आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात ही योजना काँग्रेसने सुरू केली. जर ही राज्यात सुरु झाली नसती, तर आमच्या जाहीरनाम्यात ही योजना आली असती, असेही त्यांनी नमूद केले.
कराड – चिपळूण लोहमार्गाचे काम पूर्ण होईल : कराड – चिपळूण लोहमार्ग करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना तरतूद केली होती. मात्र, 2014 मध्ये भाजप सरकारने हे पैसे बुलेट ट्रेनकडे वळवले. त्यामुळे कराड – चिपळूण लोहमार्गाचे काम रखडले आहे. येत्या निवडणुकीनंतर आमचेच सरकार येणार असून, कराड – चिपळूण लोहमार्गाचे काम पूर्ण होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काहींनी राज्यात गैरसमज पसरवला : नागपूर भागातील गोसी खुर्द प्रकल्प पूर्ण होत नसल्याचे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी त्या खात्याची श्वेतपत्रिका काढली. यामागे माझा तो कोणताही चौकशी लावण्याचा हेतू नव्हता. तर तो राज्यासाठी हिताचा निर्णय होता. परंतु, काहींनी याचा राज्यात गैरसमज पसरवला.
लहानपण व शिक्षण ते दिल्लीपर्यंतचा प्रवास : या मुलाखतीत समीरण वाळवेकर यांनी आ. चव्हाण यांचे लहानपण व शिक्षण, इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण ते दिल्लीपर्यंत पोहचणे असो. तेथे त्यांची संगणकामध्ये मराठी भाषेचे रूपांतरण करताना त्यांची पहिली ओळख राजीव गांधींशी होणे मग ते राज्यसभेतील खासदार, त्यानंतर कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होणे आणि तेथून त्यांचा केंद्रातील राजकीय प्रवास. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीसपद, विविध राज्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत केंद्रात पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबर राहून अणुकरार, अणू ऊर्जा आणि आंतरीक्षक खाते सांभाळत देशाच्या सर्वोच्च मंडळात काम करण्याची यशस्वी केलेली जबाबदारी. तसेच भारत सरकारचे युपीएससी व कार्मिक खातेही त्यांनी सांभाळले. हा उलगडलेला प्रवास ऐकत असताना देशाचे सीबीआय व ईडी खाते हाताखाली होते. तरी कोणावरही कारवाई उगारली नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मिश्किलपणे टिप्पणी केली.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी सहकार राज्यमंत्री आ. विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात, माजी जि.प सदस्य शंकरराव खबाले, नामदेवराव पाटील, राजेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कराड दक्षिणमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.