सीमा पाटील यांचे प्रतिपादन; शारदीय व्याख्यानमालेचे पुष्प सहावे, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचारांत वाढ
कराड/प्रतिनिधी : –
आज बदलापूर आणि मणिपूरसारख्या घटनांमधून वाढत चाललेली पुरुषी मनोविकृती प्रखार्षणे दिसून येते. काहीवेळा राज्यकर्ते, प्रसारमाध्यमे अशा घटना समाजासमोर येऊ देत नाहीत. परंतु, स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार आपण थांबू शकत नाही का? असा सवाल उपस्थित करत जशा पुरुषांच्याही काही चुका आहेत, तशाच स्त्रियांनीही आपल्या चुकांकडे पाहावे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जसे पुरुषभान आवश्यक आहे, तसेच स्त्रीभानही आवश्यक आहे, असे प्रतिपादन समाजसेविका सौ. सीमा पाटील यांनी केले.
येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत मंगळवार, दि. 8 रोजी सहावे पुष्प गुंफत ‘स्त्री समजून घेताना’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, नायब तहसीलदार युवराज पाटील, प्रशांत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्त्रियांवरील अन्याय, अत्याचारांमध्ये वाढ : स्त्रियांवरील वाढत्या अन्याय, अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना सौ. पाटील म्हणाल्या, अगदी पुराणकाळापासून काही प्रवृत्तींमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित असल्याचे दिसून येते. याबाबत केवळ समाजाच्या संशयावरून सीता मातेला द्यावी लागलेली अग्निपरीक्षा आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा दाखला देत निसर्गाने माणसाला मेंदू का दिलाय? माणसाचा राक्षस का झालाय? हे आपण समजून घेतो का? असे प्रश्न उपस्थित करत संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय आणि बसवेश्वरांचे दाखले देत माणूसपणाबाबतचे विचार त्यांनी यावेळी मांडले. तसेच या राष्ट्राला, विश्वाला आपण काय दिले, हेही प्रत्येकाने समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तृतीयपंथ्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार :तृतीयपंथ्यांबाबत समाजमनामध्ये असलेल्या मत्सराबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आजही तृतीयपंथ्यांना समाजात माणूसपणाची, समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटले जातात, दगडाच्या देवाचा आधार घेतात. त्यांना हाडामासाची माणसे फार दूरची वाटतात. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याच्या अधिकार आहे. आज देशात तृतीयपंथ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याची गरज असल्याचे सांगत माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना याबाबत पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
…त्यासाठी आधी माणूस बना : त्या म्हणाल्या, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्त्री सन्मान आणि अन्याय, अत्याचारांबाबत, अनिष्ट प्रथांबाबत अनेक समाजसुधारकांनी आवाज उठवला, लढा दिला आहे. परंतु, आजही विधवांना त्यांची स्वप्न, भावी आयुष्य मनासारखे जगण्याचा अधिकार आहे का? त्यांनी सुवासिनींसारखे वागण्याचा प्रयत्न केल्यास जग स्वीकारत नाही. अशा अनिष्ट प्रथांना आपण आजही कवटाळून बसलो. या सर्व परिस्थितींमध्ये बदल घडवण्यासाठी आपण आधी माणूस झालो पाहिजे,
तिथेच मुला, मुलींचा मानसिकदृष्ट्या खून करतो : मुला, मुलींमध्ये नैसर्गिक बदल होत असताना घरातूनच त्यांच्यावर बंधने घातली जातात. तिथूनच आपण त्यांचा मानसिकदृष्ट्या खून करत असतो, याची जाणीव आपल्याला नसते. यासाठी माणूस म्हणून माणसाकडे नेण्याचा प्रवास आपल्याला जगता आला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्त्री-पुरुषांमध्ये 70 टक्के समानता :स्त्रियांच्या रोजच्या दिनक्रमाचे मोल केले जात नाही. स्त्रीला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत, आर्थिक बाबीत सहभागी होऊ दिले जात नाहीत. त्यामुळे स्त्री खचली जाते. तसेच पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही सुनेच्या रूपाने घरात येणाऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे. शारीरिक दृष्टिकोनातून प्रत्येक स्त्री-पुरुषांमध्ये जवळपास 70 टक्के समानता असते. हेही प्रत्येक पुरुषाने समजून घ्यावे. पुरुषांमध्येही चांगुलपणा आहे. परंतु, सध्या शंभरात तो वीस टक्केच दिसून येतो. जसे स्त्रियांवर अन्याय होतात, तसे पुरुषांवरही होतात. अशावेळी स्त्रियांनीही त्यांना समजून घ्यायला हवे.
‘एकदा बाई होऊन बघा’ : याप्रसंगी त्यांनी ‘एकदा बाई होऊन बघा’ ही कविता सादर करत त्याद्वारे स्त्रीत्वाच्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या. तसेच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि दिलेले योगदान त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर मुलांबरोबर मुलींनीही आई-वडील, सासू-सासर्यांना समजून घेतले पाहिजे. पर्यावरणाची साखळी आपण खंडित करत आहोत, त्याचा समतोल राखला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
स्त्रीत्वाचेही पूजन करा
नवरात्रोत्सवात नवदुर्गांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे स्त्रीत्व समजून घेऊन स्त्रीलाही पुजायला हवे. स्त्रियांनीही पोथ्या, पुराणे वाचण्यापेक्षा ज्ञानाची द्वारे खुली करणारी पुस्तके वाचायला हवीत. शाळा स्तरापासूनच लिंगभेद, स्त्री-पुरुष समानता याबाबत प्रबोधन करणे गरजेचे असल्याचेही सौ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होऊ नका
हल्ली व्हाट्सअपसारख्या सोशल माध्यमामध्ये आपण गुरफटत चाललो आहोत. त्यामुळे व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी न होता संतांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आचरणात आणावी. वाचनाची चळवळ चालवली, स्त्री-पुरुष समानता ठेवली, तर विचारांच्या कक्षा रुंदावतात, असे मतही सौ. पाटील यांनी व्यक्त केले.
स्त्रीत्व समजून घेतले पाहिजे
प्रारंभी, शुभेच्छा देताना माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, स्त्री ही अनन्य काळाची माता आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर केला पाहिजे. यासाठी पुरुषांनी आई, बहीण, बायको, मुलगी, मावशी, आजी आदी स्त्रीत्वाला समजून घेतले पाहिजे.