भारत हा जगाच्या कुटुंबातील देवघर, तर आई देवत्व

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ह.भ.प. रोहिणीताई परांजपे; शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प 

कराड/प्रतिनिधी : –

संतत्वाच्या दर्जाला आणि पदाला संतांनी आईला नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती ही विश्वगुरू मानणारी संस्कृती असून ‘मातृ देवो भव’ हा पहिला नमस्कार मातेला केला जातो. संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी आपली मातृसंस्कृती आहे. त्यामुळे भारत हा जगाच्या कुटुंबातील देवघर; तर आई हे देवत्व आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार ह. भ. प. रोहिणीताई परांजपे यांनी केले.

येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत सोमवार, दि. 7 रोजी पाचवे पुष्प गुंफताना मातृमहिमा या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नायब तहसीलदार युवराज पाटील, ऐश्वर्या पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराडशी माझे ऋणानुबंध : प्रारंभी, रोहिणीताई परांजपे कराडबाबतचे ऋणानुबंध सांगताना म्हणाल्या, कराडची माती हे माझे माहेर आहे. मी शाळेत असताना पहिले भाषण यशवंतराव चव्हाण यांच्यावरच केले होते. आज त्यांच्याच नावे असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मातृमहिमा या विषयावर, तेही तब्बल 92 वर्ष अव्यहातपणे तेवत असलेल्या या ज्ञानयज्ञात बोलण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते.

नवरात्र आणि व्याख्यानमाला ही ज्ञानाची दिवाळी : नवरात्र आणि व्याख्यानमाला ही ज्ञानाची दिवाळी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, ज्ञानशक्ती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या नऊ दिवसांत जागृत झाली पाहिजे. कराडची नगरी ही संत, वीर, साहित्यिक, राजकारण आणि समाजकारण्यांची भूमी असून सर्वच बाबतीत या भूमीचे योगदान मोठे आहे.

आई काळजाच्या जवळचा पहिला बंध : मातृमहिमा सांगताना त्या म्हणाल्या, काळजाच्या जवळ असलेला पहिला बंध म्हणजे आई. अध्यात्म हे भारताचे काळीज आहे आणि याच अध्यात्माने मातेला सर्वोच्च स्थान दिले. परंतु, आज घराघरातून आई निघून गेली आणि मम्मी दिसायला लागलीय. त्यामुळे मातृत्व निघून गेले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जगाने गोमातेला मातृशक्ती म्हणून पाहिले : नास्तिक माणूसच खरा आस्तित असतो. भीतीपोटी का होईना, तो भगवंताचे नाव घेतो. ती शक्ती जागृत होणे गरजेचे आहेत. संतांनी केलेले समुपदेशन हे सर्वात मोठे समुपदेशन आहे. भारतीय संस्कृतीचा आधार घेत गोमातेला मातृशक्ती म्हणून जगाने पाहिले. मात्र, मातेचे महत्व न कळल्याने आज कत्तलखान्यांमध्ये वाढ होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आईवेड्या माणसांनीच इतिहास घडवला : हल्ली सुशिक्षित, शिकलेला तरुण आईला काही कळत नाही, असे म्हणत असतो. मात्र, आईला कधीच अडाणी म्हणू नका. तिच्या रूपाने अनुभवांचे विद्यापीठ आपल्या घरात आहे, हे लक्षात ठेवा. याप्रसंगी माय या शब्दाच्या अर्थाचा बहिणाबाईंच्या काव्यपंक्ती गायनातून उलघडा करत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच सध्याच्या परिस्थितीचा विरोधाभास सांगताना वृद्धाश्रमाची वाढत असलेली संख्या खूप वाईट आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच आईवेडी मंडळी लोकोत्तर पुरुष ठरली. आईवेड्या माणसांनीच या देशात इतिहास घडवला. त्यामुळे आपल्याला आईवेडे व्हावे लागेल, असे सांगून त्यांनी पुन्हा बहिणाबाईंच्या अभंगांच्या जागर केला.

भारतभूमीने अनेक क्रांतिकारी दिले : आज माणसातला माणूस आपल्याला दिसत नाही, तर आईतले, निसर्गातले मातृत्व कसे दिसेल, ही सध्याची परिस्थिती आहे. मुलांच्या यशाची उंची पाहिल्यावर आईच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रूच यशाची खरी पोहोचपावती आहे. मुलांचे पोषण करताना आई स्वतःचे अस्तित्व पणाला लावते. त्यामुळे आईचे ऋण कधीही फेडता येत नाहीत. मातृभूमीसाठी लढणारे अनेक क्रांतिकारी या भारतभूमीने दिले आहेत. याप्रसंगी त्यांनी भगतसिंग आणि त्यांच्या आई, स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आई, जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण आणि विठामाता, तसेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमाता यांच्या मुलांच्या हृदयस्पर्शी कथा सांगितल्या.

आई शक्ती, भक्ती, विश्वास, वात्सल्य आणि प्रेम : त्या पुढे म्हणाल्या, आज घराघरात संवेदना बोथट होत चालल्या आहेत. त्यामुळे आजच्या मुलांना श्यामची आई सांगण्याची गरज आहे. आजची आई अर्थप्राप्तीसाठी जगायला शिकवेल. आई संस्कारांची शिदोरी वेळोवेळी मुलांना देत असते. मातृशक्ती द्यायला शिकवते. आई शक्ती, भक्ती, विश्वास, वात्सल्य आणि प्रेम आहे. संतांनी दिलेली ज्ञानेश्वरी, दासबोध, हरिपाठाची शिदोरी घेतली, तर वयाच्या साठीनंतर जगाने दिलेले नाकारलेपण जेव्हा येते, तेव्हा संतरूपी विचारांची शिदोरी हाती येते, ही खंत आहे.

जिजाऊ नसत्या, तर कदाचित छत्रपती घडले नसते

छत्रपती शिवाजी महाराज लढले कसे, यापेक्षा आपण राजे घडले कसे याचा विचार आपण फार कमी करतो. बाळ गर्भात असल्यापासून त्याच्यावर संस्कार करावे लागतात. जिजाऊंनी तेच केले. त्यांना शूर-वीरांच्या, न्याय-अन्याय, स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न निर्माण केले. शिवरायांनीही आईचे स्वप्न सत्यात उतरवले. संस्कारांची शिदोरी मातेने दिली म्हणून राजे घडले. त्यामुळे राजमाता जिजाऊ नसत्या, तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते, असे सांगत असा परक्रमी पुत्र जन्माला यावा, असे वाटत असेल; तर मातृमहिमा ऐकला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाचायला नव्हे, तर वाचायला शिका

हल्ली नवरात्रीत अनेक तरुण-तरुणी टिपऱ्यांच्या तालावर नाचताना दिसतात. गर्भापासूनच संस्कारांचे योग्य सिंचन झाले, तर बाहेरून होणारे विचारांचे हल्ले कधीही जखमा देत आहेत. हल्ली लेकींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची वेळ येते. माणसांचा संवेदनशीलपणा कमी झाला असून सोशल मीडियात आपण गुरफटत चाललोय. त्यामुळे युवा पिढीने नाचायला नव्हे, तर वाचायला शिकले पाहिजे. असे सांगत त्यांनी जगात आईला मिळालेल्या देवत्वाचा पुन्हा उल्लेख केला. तसेच याप्रसंगी श्रोत्यांमधून आलेल्या मागणीनुसार त्यांनी तुकोबारायांचा अभंग घेत आपल्या मधुर गायनातून श्रोत्यांना पुन्हा मंत्रमुक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!