कराडच्या शारदीय व्याख्यानमालेत राहुल गिरी यांचे प्रतिपादन; माय, माती आणि माणुसकीला विसरू नका
कराड/प्रतिनिधी : –
स्वामी विवेकानंद हे संपूर्ण जगासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे आचार, विचार, संस्कार, देशप्रेम आपणा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेच. परंतु, त्यांची अमोघ वाणी, विचार, बुद्धिमत्ता, सर्वसमभाव आणि चारित्र्यसंपन्नता संपूर्ण जगाला मोहित करते. अशा तेजस्वी, ज्ञानी तरुणांची आज जगाला भारताकडून अपेक्षा आहे, असे प्रतिपादन युवा व्याख्याते राहुल गिरी यांनी केले.
शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प : कराड नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत रविवार, दि. 6 रोजी चौथे पुष्प गुंफताना ‘तरुणाई : पालकांची आशा आणि भविष्याची दिशा’ ते या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती :यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, नायब तहसीलदार युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हीच खरी कराडची ओळख आणि कर्तृत्व : कराड व साताऱ्याचे कर्तृत्व सांगताना श्री. गिरी म्हणाले, साताऱ्यात आल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील साहेब यांची आठवण होते. हिमालयावर संकट आल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने कराड, साताऱ्याचा सह्याद्री खंबीरपणे मदतीला धावून जातो, हीच खरी कराडची ओळख आणि कर्तृत्व आहे. आजच्या तरुणाईच्या खांद्यावरच या युगाचे भविष्य आहे. परंतु, शाळा, विद्यालयातून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाईची पावले आज व्यसनाधीनतेकडे वळतात, ही मोठी चिंतेजी बाब आहे. मुलांच्या चुकांवर पांघरून घातल्याने मुलांच्या आयुष्याची दिशा आपणच भरकटवतो, याची जाणीव ठेवून मुलांची पावले प्रेयसाकडून श्रेयसाकडे कशी जातील, हे पालकांनी पहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माणूस त्याच्या विचारांवरून तरुण ठरतो : तरुण कोणाला म्हणावं? हे सांगताना ते म्हणाले, लेकरांची लहान वयातच भविष्याची पावले पडतात. राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या भविष्याला कशी दिशा दिली, हे आई-वडिलांनी जाणून मुलांवर संस्कार केले पाहिजेत. ज्या माणसाला पडल्यावर उठताना कोणाचातरी आधार घ्यावा लागतो, त्याला पडल्यावर कधीही उडता येत नाही. माणूस त्याच्या विचारांवरून तरुण ठरतो. जो कुटुंबाला, समाजाला तारण्याचे काम करतो, तोच खरा तरुण आहे.
भावनांची धार बोथट होत चाललीये :आजची तरुणाई सोशल माध्यमांमध्ये बुडाली असून त्यांच्या भावनांची धार बोथट होत चाललीये. कुटुंबातील संवाद कमी झाल्याने ओठांवरील संवाद बोटांवर आलाय. मोबाईल, सोशल माध्यमे तरुणांवर आधिराज्य गाजवतोय. यातून अतिरेक होते का? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाल्यावर त्याचे विष तयार होते. त्यामुळे तरुणांनी मोबाईलचा अतिवापर व गैरवापर टाळावा.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श ठेवा : तरुणाईने आदर्श कोणाला मानावे! हे सांगताना ते म्हणाले, आज नवीन गोष्टींची, विचारांची उत्पत्ती होताना दिसत नाही. पूर्वी मुलांपुढे तसे आदर्शही होते. आज आई-वडीलचं मुलांना तुझे आदर्श कोण आहेत? हे विचारही नाहीत. बहुतांशी मुलांचे चित्रपटातील नायक, खलनायक हेच आदर्श असल्याचे दिसते. परंतु, आज तरुणाईने काल्पनिक आदर्श ठेवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श ठेवावा. आई-वडील, पालक मुलांना हेच सांगायला कुठेतरी कमी पडताहेत. हल्लीचे आई-वडील मुलांकडून फक्त पैसे कमवण्याची अशा करतात. त्यामुळे मुलांच्या आयुष्याची दिशा बदलते. खरेतर, आजच्या तरुणाईने युगपुरुषांचे विचार पुढे नेण्याचे काम करायला हवे. भारतीय तरुणांकडून जगाला खूप आशा आहेत. असे सांगून श्री गिरी म्हणाले, जग गाजवायचे सामर्थ्य आपल्या तरुणांमध्ये असून त्यांनी देशाची यशस्वी परंपरा चालू ठेवली पाहिजे. आपल्याला त्यागाची परंपरा आहे. भोगाची नव्हे. आजच्या पिढीला तो त्याग शिकवण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आई-वडील, कुटुंब आणि समाजाचाही उद्धार करा : आज्ञाधारक शिष्य आणि मुले कशी असावीत हे सांगताना ते म्हणाले, श्रीराम व राजा दशरथ, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस अशा आज्ञाधारक शिष्य आणि मुलांची आज जगाला गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका युवकाला दिलेला सल्ला सांगताना ते म्हणाले, एखाद्याचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा शिक्षण घेऊन यशस्वी व्हा. स्वतःसह आई-वडील, कुटुंब आणि समाजाचाही उद्धार करा. राजकारणात, समाजकारणात जरूर या. पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभे रहा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी तरुणाईला दिला.
आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करा :आज आई-वडिलांपेक्षा कुठल्यातरी फुटकळ नेत्याचा मुलं आदर करताना दिसतात. शिवरायांनी जसे स्वराज्य निर्मितीतून जिजाऊंच्या डोळ्यातले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले, तसे तरुणाईनेही आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातले स्वप्न पूर्ण करून स्वराज्य निर्मावे, असे मौलिक मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. तसेच आजची मुले आई-वडिलांना तुम्ही माझ्यासाठी काय केले, मला काय दिले, हे विचारतात. यावेळी शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचे उदाहरण देत ते म्हणाले, ज्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, त्यांना शहाजीराजांनी काय दिले होते, असा आई-बापानेही पोरांना प्रतिप्रश्न करावा. आज अनेक मुले परिस्थितीचे भांडवल बनवतात. परंतु, एका अपयशाने जग संपत नाही. याबाबत एक मौलिक उदाहरण देऊन ते म्हणाले, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. मुलांनाही परिस्थितीवर मात करून मोठे होता आले पाहिजे. मुलींना काही अटी घालण्यापेक्षा मुलांचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्नही प्रत्येक आई-वडील, पालकांनी करायला हवा. निगेटिव्ह बोलण्यापेक्षा त्यांनी मुलांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण करावी. शिक्षणाकडे नीट बघून त्याचा खरा अर्थ समजून घ्या. माणसातले माणूसपण समजवण्याचे काम शिक्षणाने केले असून शिक्षणाचा खरा अर्थ माणूसपण रुजवणे हा आहे, हे मुलांनी, पालकांनी समजून घ्यावे.
सोशल माध्यमांचा उपवास करा
आजची पिढी आपल्या यशाचे मोजमाप फेसबुक, इन्स्टावर टाकलेल्या फोटोवरील कमेंट आणि लाईक्सवरून ठरवतात. लहान मुलांचा मोबाईल स्क्रीन पाच-सहा तास राहिला, तर त्यांना ब्रेन ट्युमर होऊ शकतो. मोबाईलच्या अतिवापराने गुन्हेगारी वृत्ती वाढते. याउलट त्यातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून यशप्राप्ती करावी. याबाबतचे एक हृदयस्पर्शी उदाहरण सांगत ते म्हणाले, तरुणाईने फेसबुक, इन्स्टाच्या लाईक्स वाढवण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवून आई-वडिलांना समाजात मान, सन्मान कसा मिळेल, हे पहावे. यासाठी तरुणाईने काही दिवस, महिने, काही वर्षे फेसबुक, इन्स्टासारख्या सोशल माध्यमांचा उपवास करावा, असे आवाहनही राहुल गिरी यांनी यावेळी तरुणाईला केले.
देश, समाजहितासाठी तरुणाईचा वाटा असावा
आज आई-वडील, शिक्षक, पालकांनी तरुणाईच्या खांद्यावर काहीतरी दातृत्व देणे गरजेचे आहे. देशाची संपत्ती ही आपली संपत्ती असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी, असे सांगत तरुणांनी माय, माती आणि माणुसकीला विसरता कामा नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.