वाचा….. “गोष्ट पैशापाण्याची”!

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रखर बुद्धी आणि पैशावर जग चालतं – प्रफुल्ल वानखेडे

शारदीय व्याख्यानमालेत ‘गोष्ट पैशापाण्याची’ विषयावर प्रकट मुलाखत

कराड/प्रतिनिधी : –

गुजराती, मारवाडी लोक व्यवहार शिकून काळाच्या बरोबर किंबहुना काळाच्या पुढे विचार करतात. त्याप्रमाणे मराठी माणसांनीही काळाच्या पुढे चालायला हवे. आपण मार्केटिंगकडे दुर्लक्ष करतो. जगभरातील बेस्ट ब्रेन भारतात यावेत, अशी इकोसिस्टीम आपण तयार का करत नाही? कराडसारख्या शहरात अनेक कॉलेजेस व प्रचंड बुद्धिमत्ता असताना आपण बंगलुरुसारखी इंडस्ट्रीज येथे का उभारत नाही? असे सवाल उपस्थित करत जगात बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रखर बुद्धीमत्ता आणि पैशावरच जग चालतं, असे प्रतिपादन पुणे येथील केल्विन व लिक्विगॅस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे यांनी केले.

शारदीय व्याख्यानमाला : येथील कराड नगरपरिषद व नगरवाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेत शनिवार, दि. 5 रोजी ‘गोष्ट पैशापाण्याची’ या विषयावरील प्रकट मुलाखतीत तिसरे पुष्प गुंफताना मुलाखतकार, मुक्त पत्रकार संपत मोरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. अर्थशास्त्राच्या व्यवहारात गणित फसतय का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.

प्रारंभी, मुलाखतकार संपत मोरे यांनी पैशाचे मूल्य काय? असे विचारले असता पैसा मिळवला म्हणजे माणूस यशस्वी झाला, असे नाही. तर पैशाशी आपण कसे वागतो, यावर आपले भविष्य ठरते, असे श्री वानखेडे यांनी सांगितले. तसेच याप्रसंगी कराड बद्दलची आत्मीयता व्यक्त करत कराड शहर आणि सातारा जिल्ह्याला यशवंत विचारांचा वारसा लाभला असून त्या विचाराने तब्बल 92 वर्ष नगरवाचनालयासारखी संस्था कार्य करते, ही मोठी कौतुकाची बाब असल्याचे गौरोवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

पैसे मिळवणे ही एक कला आहे का? या संपत मोरे यांच्या प्रश्नावर बोलताना श्री वानखेडे म्हणाले, पैसा कमवायला चिकित्सक वृत्ती, व्यवहारज्ञान आणि खूप प्रमाणिकपणा लागतो. पैसा शिकायला 25-30 वर्षे लागतात. त्यामुळे गुजराती, मारवाडी लोकांप्रमाणे मुलांना घरातून पाचवी, सहावीत असल्यापासून पैसा कमवायचे ज्ञान, व्यवहारज्ञान शिकवले पाहिजे. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. पैसा चांगल्या मार्गाने येतो का? तो आपण चांगल्या पद्धतीने गुंतवतोय का? आपण धोके किती पत्करतो, हे पहावे.

शेअर मार्केटिंग एक मायाजाल आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, शेअर मार्केटिंग हा गुंतवणुकीतला एक पर्याय आहे. स्वतः अभ्यास केल्याशिवाय आणि या क्षेत्राचा अभ्यास नसलेल्यांवर विश्वास ठेवून, कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका. खर्च वाचवून गुंतवणुकीवर भर द्या. मत्सर आणि एकमेकांचा द्वेष करणे सोडून हाव कंट्रोलमध्ये ठेवा. अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
यशवंतराव चव्हाण आणि आताचे राजकारणी यांच्यात काय फरक आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मी काही राजकारणी नाही. परंतु, शिक्षक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या कामावर फोकस करून सर्व समावेशक भूमिका ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुलाखतकार संपत मोरे यांनी प्रमाण मराठी भाषेबद्दल त्यांना आलेला गमतीशीर अनुभव सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि प्रमाण मराठीच्या न्यूनगंडातून कसे बाहेर पडावे? या प्रश्नावर श्री वानखेडे यांनीही त्यांचे काही गमतीशीर किस्से सांगितले. यावेळी श्रोत्यांमध्ये चांगलीच खसखस पिकली. भाषेच्या न्यूनगंडाबाबत बोलताना ते म्हणाले, इंग्रजी आणि प्रमाण भाषा बोलणारे खूप हुशार असतात, असे आपल्याला वाटते. परंतु, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचे खरे ज्ञान कळते, अशी मुश्किल टिप्पणी करत नवनवीन इंग्रजी आणि प्रमाण भाषेतील शब्दांचे वाचन व त्यांच्या उच्चारावर भर द्या. इंग्रजी ही ज्ञानभाषा आणि मोठा ज्ञानस्त्रोत असून मुलांनी दर्जेदार इंग्रजी साहित्य, वृत्तपत्र व साप्ताहिके वाचल्याने दहा वर्ष पुढचे जग ओळखता येईल. त्यामुळे अज्ञातात सुख असल्याचे सांगत ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड सोडून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे संवाद हरवत चाललाय का? या प्रश्नावर ते म्हणाले, आजच्या घडीला तुम्ही मोबाईलपासून दूर गेलात, तर तुम्ही जगापासून दूर व्हाल. नंदन लीले यांच्या पुस्तकाचा आधार घेत त्यांनी मोबाईलच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच आपणास मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप अशा डिजिटल डिव्हाइसचे वर्गीकरण करता आले पाहिजे. आपण कोणत्या संगतीत राहतो, त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. त्यामुळे मोबाईलचा चांगल्यासाठी वापर करून अतिवापर टाळता आला पाहिजे.

टाईम मॅनेजमेंटवर बोलताना ते म्हणाले, आपल्याला सहज नाही म्हणता आले पाहिजे, ही टाईम मॅनेजमेंटची एक पायरी आहे. पैसा आणि वेळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. त्यामुळे आपल्या कामावर फोकस करावा. टाईम मॅनेजमेंट हाही यशस्वी होण्यामागचा एक मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे अनेकांनी भरभरून कौतुक करत खूप सगळ्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिल्याचे सांगत श्री वानखेडे म्हणाले, या पुस्तकांने मला माणूस म्हणून खूप श्रीमंत केले, संवेदनशील बनवले. तसेच माझ्या पुस्तकाने एका घटस्फोटित दाम्पत्याला एकत्र आणल्याचा किस्साही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितला. यावेळी श्रोत्यांनीही जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

आपल्या बिजनेसच्या टेक्निक्स काय आहेत? या श्रोत्यांमधून आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, हल्ली फार कॉमन बिजनेस केले जातात. चुलीवरच्या पदार्थांची हल्ली एकप्रकारची लाटच आली आहे. यासाठी कराडमध्ये इनक्युबेशन सेंटर चालू करा. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू, अशी ग्वाही श्री वानखेडे यांनी यावेळी दिली. तसेच नवनिर्मिती करा, ज्या क्षेत्रात फारसे लोक नाहीत, ते क्षेत्र आव्हान म्हणून स्वीकारा, असा सल्लाही त्यांनी दिला.

नेमकं काय वाचलं पाहिजे? या प्रश्नावर ते म्हणाले, वाचन ही जगाच्या पुढे नेणारी गोष्ट आहे. वाचनाने भविष्याकडचा प्रवास सुरू होतो. तसेच आधुनिक जगाकडे जाण्याचा मार्ग पुस्तकातून जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास कराड नगरपरिषदेचे लेखापाल मयूर शर्मा, कर सहाय्यक दिपाली साबळे, दत्तात्रय तारळेकर, पत्रकार हेमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेचे अधिकारी माणिक बनकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सूत्रसंचालन सुहास इनामदार यांनी केले. अभियंता ए. आर. पवार यांनी आभार मानले.

यशवंतराव चव्हाण यांचे सहकार तत्व अवलंबा

गोंधळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना काय मार्गदर्शन कराल? यावर मीही अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे सांगत ते म्हणाले, शेतात खत, बाजारात पत आणि घरात एकमत असेल, तरच गाडी सुसाट चालते. हल्ली घराघरात एकमत दिसत नाही. लोकसंख्या वाढीमुळे जमिनीची विभागणी झाली. प्रीतिसंगम हे दोन नद्या आणि विचार एकत्र येण्याचे ठिकाण आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसार सहकार तत्वावर गटशेती करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल स्वतः विकल्यास चांगला फायदा होईल. जगाच्या बाजारपेठेत काय विकत हे बघून पीक घ्या, असेही त्यांनी सांगितले.

…तर, जगभरातील लोक कराडला येतील

महात्मा गांधी म्हणाले गावाकडे चला, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे चला. या तत्कालीन विचारांवर ते म्हणाले, सध्याच्या घडीला तब्बल 55 टक्के शहरीकरण झाले आहे. त्यामुळे एकत्र रहा आणि विज्ञान, तंत्रज्ञानाचा अवलंब करा. मुंबईला इंग्रजांनी आर्थिक राजधानी बनवली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला. तसेच उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी एमआयडीसी निर्माण केल्याने आज हेच महाराष्ट्राच्या संपत्तीचे कारण बनले आहे. 1990 च्या दशकात सॉफ्टवेअर बनले, तंत्रज्ञानामुळे विकासाची गती वाढली. कराड हे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी सर्व सोयी, सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या विद्यानगरीत अनेक शाळा, महाविद्यालये आणि प्रचंड बुद्धिमत्ता असून पुढील 50 वर्षांचा विचार करून याठिकाणी जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर उभारल्यास जगभरातील लोक करायला येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!