डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून 6.38 कोटींचा निधी मंजूर
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम आता कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. डॉ. भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आणखी 6.38 कोटींचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून कराड शहराला पाणीपुरवठा करणारी कोयना नदी पात्रामधील निकामी झालेली 600 एम.एम. व्यासाच्या रॉ वॉटर पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
अशुद्ध पाणीउपसा करण्यासाठी जॅकवेल : कराड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वारुंजी गावाच्या हद्दीमध्ये अशुद्ध पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आला आहे. याठिकाणच्या पंपांमधून अशुद्ध पाणीउपसा करुन ते 600 एम.एम. व्यासाच्या पाईपलाईनद्वारे कोयना नदी पात्रामधून पंकज हॉटेलमागील नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात होते. जवळपास 2018 पासून या पद्धतीने कोयना नदी पात्रातून पाणी आणून ते शुद्ध करुन संपूर्ण शहराला पुरविले जात होते.
कराड शहरात पाणीबाणी : दरम्यान, कोयना नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे पाणीउपसा करणाऱ्या या पाईपलाईन निकामी झाल्याने संपूर्ण कराड शहराला पाणीबाणीला सामोरे जावे लागले. सुमारे 5-6 दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याने कराडकरांवर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली होती.
कृष्णा उद्योग समूहातर्फे अहोरात्र पाणीपुरवठा : या पाणीबाणीवेळी डॉ. अतुल भोसले यांनी कराड शहराला कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून टँकरद्वारे अहोरात्र पाणीपुरवठा करुन कराडकरांची तहान भागविली. कराडचा पाणीपुरवठा नियमित व्हावा, यासाठी पहिल्या दिवसापासून कंबर कसून मैदानात उतरत त्यांनी पाणीपुरवठ्यातील बिघाड दूर करण्यासाठी तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पातील जुने जॅकवेल कार्यान्वित करण्यासाठी कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सच्या इरिगेशन विभागालाही कामाला लावले. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेसाठी शासन स्तरावरही प्रयत्न चालविले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा : याच पाणीबाणीच्या काळात डॉ. अतुल भोसले यांनी थेट मुंबई गाठत कोयना नदीपात्रातील निकामी झालेल्या 600 एम. एम. व्यासाच्या रॉ वॉटर पाईपलाईनच्या कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी 6.38 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
नगर विकास खात्याकडून पाहणी : ना. फडणवीस यांनी डॉ. भोसले यांच्या मागणीची तातडीने दखल घेत, नगर विकास खात्यास तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करुन आणि आवश्यक कामाचा अहवाल सादर केल्यानंतर शासनाने पाईप लाईन दुरुस्तीच्या कामासाठी 6.38 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत निधी : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत कराड नगरपरिषदेला हा निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या खर्चाचा कोणताही भार सोसावा लागणार नाही. या निधीतून कोयना नदी पात्रातील पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने, येत्या काळात कराडच्या नागरिकांची पाणी समस्या कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार आहे. या निधीमुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रकल्प खर्चाचा 100 टक्के हिस्सा शासनाचा
कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रॉ वॉटर पाईपलाईन दुरुस्तीसाठी शासनाने नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत हा 6.38 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्प खर्चाचा 100 टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याने, नगरपालिकेच्या या खर्चाचा कोणताही भार सोसावा लागणार नाही. हे काम पूर्णपणे शासनाच्या निधीतून पूर्णत्वास नेले जाणार आहे.