मतदारसंघात 30 किलोमीटर लांबीचे 15 ग्रामीण रस्त्यांचे काँक्रीटीकरण; विकासाचा वेग कायम
कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – 2 (बॅच – 1) या योजनेस शासन निर्णयान्वये संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त 7 हजार किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister MLA Prithviraj Chavan) यांनी सुचविलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (Karad South Assembly Constituency) 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना शुक्रवारी झालेल्या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे.
47 कोटी 48 लाखांची तरतूद : त्यानुसार 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना 47 कोटी 48 लाख 84 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून 15 रस्त्यांचे सुसज्जपणे काँक्रीटीकरण होणार असून, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याची प्रचिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रत्यक्ष कृतीद्वारे सिद्ध झाली आहे.
दूरदृष्टी असलेले नेतृत्व : आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांनी केलेल्या कराड दक्षिणच्या विकासाचे पैलू सर्वांना पदोपदी जाणवतात. कराड शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण आ. चव्हाण यांच्या माध्यमातून झाले. रस्ते हे ग्रामीण विकास व त्यांच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात. हे ओळखून या महत्वाच्या रस्त्यांचे चौपदरीकरण झाल्यामुळे कराड भोवतीच्या भागाचा आर्थिक विकास गतीने पुढे गेला. दूरदृष्टी व सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्यमग्न असलेले लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले आ. पृथ्वीराज चव्हाण हे यास्वरुपी विकासपुरुष म्हणूनही ओळखले जातात.
दक्षिणेतील विकास प्रक्रिया अखंडित : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हीच विकासाची दूरदृष्टी कायम राखत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाची प्रक्रिया अखंडपणे चालू ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे कराड दक्षिण विधानसभा मतदासंघामधील रस्त्यांचा शासनाच्या वरील कार्यक्रमात समावेश करून निधी उपलब्ध करण्यासाठी मागील कालावधीत शिफारस केली होती. यास शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल पारीत केलेल्या शासन निर्णयाने मंजुरी देत प्रशासकीय मान्यता दिली आहे. याद्वारे मतदारसंघातील 30 किलोमीटर लांबीच्या 15 ग्रामीण रस्त्यांना तब्बल 47 कोटी 48 लाख 84 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
या विकासकामांचा समावेश : या माध्यमातून दर्जोन्नती करण्यात आलेले रस्ते व कंसात मिळालेला निधी असा; घोगाव ते शेवाळेवाडी रस्ता (3 कोटी 50 लाख 13 हजार), वहागाव ते जुनी वनवासमाची खोडशी रस्ता (3 कोटी 84 लाख 92 हजार), तुळसण – पाचुपतेवाडी रस्ता (3 कोटी 27 लाख 35 हजार), गोपाळनगर (कार्वे) बोंद्रेवस्ती रस्ता (2 कोटी 77 लाख 77 हजार), सैदापूर कृष्णा कॅनॉल ते गोवारे हनुमाननगर रस्ता (4 कोटी 94 लाख 90 हजार), पवारवाडी – नांदगाव रस्ता (2 कोटी 38 लाख 72 हजार), जिंती ते चव्हाणमळा जिल्हा हद्द रस्ता (1 कोटी 99 लाख 63 हजार), विंग ते सुतारकी रस्ता (2 कोटी 19 लाख 46 हजार), शिंगणवाडी – पाटीलमळा रस्ता (2 कोटी 54 लाख 43 हजार), कुसुर मोरेवस्ती शेषवस्ती रस्ता (1 कोटी 52 लाख 84 हजार), गोटेवाडी ते भरेवाडी रस्ता (3 कोटी 51 लाख 78 हजार), वहागाव ते घोणशी रस्ता (5 कोटी 50 लाख 26 हजार), थोरातमळा – शेरे रस्ता (2 कोटी 65 लाख 54 हजार), शेरेपाटी-केळबावी- शेरे रस्ता (3 कोटी 17 लाख 52 हजार), काले ते संजयनगर रस्ता (3 कोटी 63 लाख 56 हजार) असा एकूण 47 कोटी 48 लाख 84 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
30 किलोमीटर मार्गाचे होणार काँक्रीटीकरण : उपलब्ध निधीतून 15 ग्रामीण रस्त्यांच्या 30 किलोमीटर मार्गाचे सुसज्जपणे काँक्रीटीकरण होणार आहे. याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्याचे व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या महत्वपूर्ण रस्त्यासाठी 4 कोटी 95 लाखांचा निधी : आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष लक्ष देवून सैदापूर कृष्णा कॅनॉल ते गोवारे हनुमाननगर या रस्त्यासाठी 4 कोटी 94 लाख 90 हजार रुपयांचा निधी मिळवला आहे. गोवारे हे कराड शहरालगतचे गाव आहे. हे गाव निमशहरी असल्याने ते झपाट्याने वाढत आहे. गाव व वाढीव भागासाठी सैदापूर कृष्णा कॅनॉल ते गोवारे हनुमाननगर हा रस्ता खूप महत्वाचा आहे.
तांत्रिक अडचणींवर मात : सदरचा रस्ता शासनाच्या जलसंपदा विभागाच्या कृष्णा कालवा हद्दीतून असल्याने त्यावर निधी उपलब्ध करताना तांत्रिक अडचणी यायच्या. तरीही आ. चव्हाण व माजी खा. श्रीनिवास पाटील यांनी आतापर्यंत तीन-चार वेळेस निधी देवून रस्ता सुस्थितीत ठेवला आहे. परंतु, आता याच रस्त्याचे काँक्रीटीकरण सुसज्जपणे होणार असून, पुढील दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती होणार असल्याने तेथील समस्येचे निवारण झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.