कराड/प्रतिनिधी : –
गेल्या वीस वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने शालेय शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये पहिली ते बारावी पूर्णवेळ मुख्याध्यापक, पुरेसे शिक्षक, लेखनिक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल व शिपाई यांची कायदा व नियमाप्रमाणे भरती केलेली नाही. शालेय शिस्त आणि विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक, लेखनिक, नाईक, ग्रंथपाल, शिपाई यांची असते. परंतु, अशी बहुसंख्य पदे रिक्त असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत सातारा जिल्हा शिक्षण संस्था, संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात (Ashokrao Thorat) यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थांची बैठक : जिल्ह्यातील शिक्षण संस्थांची सातारा येथे नुकताच घेण्यात आलेल्या बैठकीत शिक्षण संस्थांनी शिक्षक व कर्मचारी भरतीबाबत (Recruitment of teachers and staff) एक निवेदन प्रसिद्धीस दिले. यामध्ये शालेय स्तरावरील विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्यावरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांना शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बदलापूर अत्याचाराची घटना वाईट : मुख्याध्यापकांच्या हाताखाली हा कर्मचारी वर्ग पुरेसा नसला, तर शाळेमध्ये शिस्त राहत नाही व विद्यार्थी विशेषत: विद्यार्थिनींचे संरक्षण त्यांना समर्थपणे करता येत नाही. यामध्ये वर प्रकाश टाकताना अशोकराव थोरात म्हणाले, बदलापूर येथील विद्यार्थिनींवरील अत्याचाराची घटना वाईट आहे, त्याचा निषेध. पण, अशी घटना घडण्यासाठी वातावरण निर्मिती कशामुळे झाली, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
मानसोपचार तज्ञ व पुरेसा शिक्षक वर्ग आवश्यक : वाईट हेतू ठेवून शाळा परिसरातील नराधम अशा संधी व वातावरणाची वाट बघत असतात. महाराष्ट्रातील अनेक शाळा, विद्यालये, महाविद्यालयांमध्ये सर्व प्रकारची काळजी घेऊनही अशा निंदनीय घटना घडतात. याचे कारण पुरुषांची, पुरुष विद्यार्थ्यांची अयोग्य मानसिकता बदलण्यासाठी मानसोपचार तज्ञ किंवा अशा प्रकारचे प्रबोधन करणारा पुरेसा शिक्षक वर्ग शाळेत असायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
वाईट घटनांवर राजकारण नको : मुख्याध्यापकांना विद्यार्थिनी व स्त्री शिक्षिका यांचे सर्व प्रकारे संरक्षण करण्याचे धडे जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले पाहिजेत. राज्य सरकार कुठल्याही पक्षाचे असो किंवा विरोधात कोणताही पक्ष असो. अशा वाईट घटनांवर राजकारण न करता घटना कशा टाळता येतील, याबाबत विचार केला पाहिजे.
राजकीय प्रवक्त्यांची बेताल वक्तव्य रोखा : प्रत्येक पक्षाने आपल्या प्रवक्त्यांची बेताल वक्तव्ये रोखली पाहिजेत. सर्व पुरुष व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यार्थीनी, महिला शिक्षिका, माता-भगिनी या आमच्या नातलग आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, असे मनात ठेवून वागले पाहिजे, असेही श्री. थोरात यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : या बैठकीस जिल्ह्यातील शिक्षण संस्था संघाचे अधिकारी, पदाधिकारी, संस्थापक, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.