शेती पाण्याचे स्वप्न सत्यात उतरणार; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य
कराड/प्रतिनिधी : –
गेली अनेक दशके शेती पाण्याचे स्वप्न पाहणारे शामगावकर आणि पाचुंदकर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. टेंभू योजनेतील शिल्लक असलेले जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी या गावाला मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केले असल्याने व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याने शामगावकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अभियंता रेड्डीयार यांची तातडीने कार्यवाही : मलकापूर विश्रामगृह येथे देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत रामकृष्ण वेताळ यांनी शामगावची व पाचूंदची जमीन सिंचनासाठी टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे, याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनामार्फत योग्य खबरदारी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव भालेराव यांनी टेंभू जलसंपदा विभागास सूचित करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी तातडीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली असल्याने शेती पाण्याच्या लढ्याला यश आले आहे.
दुष्काळी शिक्का कायमचा पुसणार : लवकरच शामगाव आणि पाचुंद येथील कायम दुष्काळी असा शिक्का बसलेल्या या गावांची जमीन हिरवीगार बहरलेली दिसेल, असे चित्र निर्माण झाले आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे भाजप नेते आ. जयकुमार गोरे, विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे आणि कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत. शासन दरबारी यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने शामगाव व पाचुंकर आनंदी झाल्याचे दृश्य दिसत आहे.
अनेक दिवसांच्या प्रयत्नांना यश : शामगाव व पाचुंदकारांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मागील सात वर्षांपासून मी शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता करीत होतो. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.
या लढ्यामध्ये सातारा जिल्ह्याचे नेते जयकुमार गोरे, विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांचेही सहकार्य लाभल्याने हा लढा अखेर यशस्वी झाला आहे.
– रामकृष्ण वेताळ (सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा)