कराड/प्रतिनिधी : –
बँकिंग क्षेत्रात 107 वर्षांची अखंड विश्वासार्ह वाटचाल करीत असलेल्या येथील दि कराड अर्बन बँकेच्या (Kannada urban Bank) मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ एकाचवेळी कराड, पुणे, सातारा, सांगली अशा चार वेगवेगळ्या शहरांमधून करण्यात आला. गुरूपुष्यामृतच्या शुभमुहूर्तावर बँकेतर्फे ग्राहक, सभासद संपर्क व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोबाईल बँकिंग सेवेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
डिजिटल युगात बँकेचे आणखीन एक पाऊल : दि कराड अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतोय, याचा खूप आनंद आणि अभिमान आहे. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार सुलभ, सुरक्षित आणि अधिक वेगाने करू शकणार आहोत. या उद्घाटनाचा क्षण आपल्याला डिजीटल आर्थिक युगात आणखीन एक पाऊल पुढे घेऊन जात जात असल्याचे विचार बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी पुणे येथील ग्राहक मेळाव्यात व्यक्त केले.
मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा : मोबाईल बँकिंगमुळे आता कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आपण मोबाईलच्या साहाय्याने सहजपणे आर्थिक व्यवहार करू शकतो. आता बँकेच्या सभासदांनी, ग्राहकांनी नजीकच्या शाखेत समक्ष भेट देऊन मोबाईल बँकिंगची नोंदणी करून मोबाईल बँकिंग ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी कराड येथील ग्राहक मेळाव्यात बोलताना केले.
मोबाईल बँकिंग एक क्रांती : आर्थिक व्यवहार हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मोबाईल बँकिंग ही एक क्रांती आहे. यातून आपण आपल्या मोबाईलवरून एका क्लिकवर आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतो, खाती तपासणे, बिले भरणे, यांसारखे सर्व व्यवहार आता काही सेकंदातच पूर्ण करता येतील, असे विचार असे बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी सातारा येथील ग्राहक मेळाव्यात व्यक्त केले.
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मोबाईल बँकिंग : मोबाईल बँकिंगची नवी सुरूवात ही आपल्या बँकेच्या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने मोठी क्रांती ठरेल. यापूर्वी बँकिंगसाठी कित्येकवेळा प्रत्यक्ष बँकेत जावे लागायचे, तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे. मात्र, मोबाईल बँकिंगमुळे सर्व व्यवहार सोपे आणि वेळेची बचत करणारे होणार आहे. ही डिजीटल क्रांती केवळ आपल्या सोयीसाठी नाही, तर आपल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आहे, असे मत बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी सांगली येथील ग्राहक मेळाव्यात व्यक्त केले.
‘सकल पे ॲप’ ग्राहकांच्या सेवेत : “सकल जनांसी आधारू” या बँकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच मोबाईल बँकिंग ॲपचे नाव ‘सकल पे ॲप’ ठेवण्यात आले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या बँकेच्या शिरपेचात मोबाईल बँकिंगमुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे गौरवोद्वारही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी काढले.
निर्धारित वेळेआधीच मोबाईल बँकिंग सेवा सुरू : बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू केलेली मोबाईल बँकिंग सुविधा सप्टेंबर अखेर सुरू होईल, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते त्याआधीच बँकेने मोबाईल बँकिंग ॲपचे अनावरण केल्याने लवकरच ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.