ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (Brahamdas patasanstha)
मर्या., बेलवडे बुद्रुक, ता. कराड या संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (21 सप्टेंबर) रोजी सकाळी 9 वाजता बेलवडे बुद्रुक येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री. मारुती मोहिते यांच्या अध्यक्षस्थानी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
दिवंगत सभासदांना श्रद्धांजली : प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, तसेच ब्रह्मदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेच्या आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या मान्यवर व्यक्ती, तसेच सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेच्या जिल्ह्यात नावलौकिक : या सभेत बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मोहिते (सर) म्हणाले, संस्थेने गतवर्षी आपला रौप्य महोत्सव साजरा केला. आज संस्थेच्या 26 वर्षांच्या वाटचालीत संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, तसेच संस्थेचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना विनम्र सेवा देत दिलेल्या योगदानामुळे संस्थेने कराड तालुक्यासह जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवला आहे.
यशस्वी घोडदौडीसाठी सहकार्य करा :दिवसेंदिवस संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे यापुढेही संस्थेची यशस्वी घोडदौड अशीच चालू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही वसंतराव मोहिते त्यांनी यावेळी केले.
सर्व विषयांना मंजुरी : या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील यांनी दिली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन, व्हॉईस चेअरमन, तसेच सर्व संचालक आणि सभासदांकडून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
मयत सभासदांना रक्कम देण्याचा ठराव : या सभेमध्ये जर संस्थेचा एखादा क्रियाशील सभासद मयत झाल्यास त्यांना मयत फंडातून रक्कम देण्याचा ठराव या सोबत खेळत आला. त्या ठरावालाही बहुमताने मंजुरी देण्यात आले.
ऐन वेळचा विषयही मंजूर : त्याचबरोबर या सभेत ऐनवेळच्या विषयामध्ये संस्थेच्या कासारशिरंबे, ता. कराड येथील शाखेची स्वमालकीची इमारत उभारण्याचा ठराव करण्यात आला. त्यालाही बहुमताने मंजुरी देण्यात आली.
संस्थेच्या वैभवात मोठी भर : संस्थेने शेणोली, ता. कराड शाखेची भव्य व सुंदर वास्तू उभा राहिली आहे. त्यामुळे संस्थेच्या वैभवात मोठी भर पडली आहे. संस्थेची ही सुंदर वास्तू उभारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व सभासद, कर्जदार, हितचिंतक व कर्मचाऱ्यांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.
संस्थेच्या कार्याचा आढावा : संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. पतसंस्था फेडरेशनचे ऑडिटर संपतराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती : सभेस कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व संस्थेचे संचालक मिलिंद पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंतराव मोहिते, एस. के. पाटील, भरतसिंह मोहिते, माणिकराव मोहिते, सयाजीराव मोहिते, सर्व संचालक, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील यांनी केले. जयवंतराव मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महिला पतसंस्थेचीही सभा उत्साहात
ब्रह्मदास पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (21 सप्टेंबर) रोजी सकाळी 9 वाजता बेलवडे बुद्रुक येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यानंतर याच ठिकाणी ब्रह्मदास महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक, ता. कराड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन सौ. उज्वला वसंतराव मोहिते यांच्या अध्यक्षस्थानी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
हळदी कुंकू समारंभाचा ठराव
ब्रह्मदास महिला पतसंस्थेच्या वार्षिक सभेत संक्रांत सणानिमित्त संस्थेच्या महिला सभासदांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्याचा ठराव घेण्यात आला. त्या ठरावास बहुमताने मंजूर देण्यात आली. यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. उषा मोहिते, व्यवस्थापिका सौ. स्वाती मोहिते यांच्यासह सर्व संचालिका, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.