कराड/प्रतिनिधी : –
शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून या आंदोलनात संघटना सक्रीय सहभाग घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
देशाच्या विकासाचा कणा मोडण्याचा प्रयत्न : शाळा, शिक्षक तथा विद्यार्थी हे समाज तथा देशाच्या विकासाचा कणा आहेत. मात्र, शासन विविध अन्यायकारक धोरणे राबवून हा कणाचं मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सर्वसामान्य मोफत शिक्षणापासून वंचित : सरकार मान्यता तथा कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. या धोरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोफत शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
सांगकाम्या… शिक्षकांची अवस्था : सरकारकडून विविध योजना राबविण्यासाठी शिक्षकांचा वापर केला जात आहे. यामध्ये अशैक्षणिक कामे, तसेच शिक्षकांवर अनावश्यक उपक्रमांचा भडीमार होत असल्यामुळे ‘शिकविणे कमी आणि सांगकाम्या अधिक’ अशी स्थिती शिक्षकांची झाली आहे. यावरही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अनुदान, शिष्यवृत्तींबाबत चालढकल : यावर्षी गणवेश, शाळा अनुदान तथा विविध शिष्यवृत्तींबाबत सरकारकडून चालढकलपणा केला जात आहे. यामुळे विद्यार्थी विविध सुविधा व प्रगतीपासून वंचित राहत आहेत.
बुधवारी 25 सप्टेंबर रोजी आंदोलन : या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तथा शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध पुकारलेले आंदोलन संयुक्तिक आहे. त्यामुळे बुधवार, दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलन तथा त्या अनुशंगाने निश्चित केलेल्या आंदोलनाच्या विविध टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सक्रीय रित्या सहभागी होणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्व शिक्षक संघटनांनीही सहभागी व्हावे : सर्व शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या सदर आंदोलनात राज्यातील सर्व पेन्शन, शिलेदार यांनी सक्रीय सहभागी होऊन शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करावा, असे आवाहनही सदर पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या पत्रकावर महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांच्यासह सरचिटणीस किशोर पाडवी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, उपाध्यक्ष संजय आवळे, तसेच उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा त्यांची नावे व सह्या आहेत.