259 कराड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या आदेशाने यशवंतराव चव्हाण बहुउद्दशीय सभागृहात विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, कराडचे परीविक्षाधीन तहसीलदार अनिकेत पाटील, नायब तहसीलदार महेश उबारे बाजीराव पाटील, कराड व रहिमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व मध्यवर्ती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश : 259 कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाचे सूक्ष्म नियोजन करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिला.
30 समित्यांचे गठन : प्रशासनाने कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण विविध 30 समित्या गठित केल्या आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापन, नामनिर्देशनपत्र दाखल, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व्यवस्थापन, वाहतूक व परिवहन सुरक्षा, प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन, आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व निरीक्षण, मतदार जनजागृती व शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, टपाली मतदान व गृह मतदान, माध्यम, स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, संगणकीकरण, सायबर सुरक्षा, भरारी पथके, दृश्य चित्रीकरण पथके, स्थीर पथके, मतदार यादी व्यवस्थापन, मतमोजणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट जोडणी, मद्य जप्ती, निवडणूक निरीक्षक व्यवस्था आदी विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शनपर विविध आदेश पारित केले. प्रत्येक मध्यवर्ती अधिकाऱ्यांनी आपले सूक्ष्म नियोजन लेखी स्वरुपात सादर करून निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.