वन विभागाकडून पंचनामा; निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
तळमावले/वार्ताहर : –
धामणी, ता. पाटण येथील धामणी-मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत सुमारे दीड वर्षांची मादी बिबट्या असून तिचा निमोनिया आजारामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण घटना उघडकीस : याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील धामणी येथील धामणी-मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये वनरक्षक अमृत पन्हाळे, कर्मचारी वनमजूर नथुराम थोरात, वामन साळुंखे, अजय कुंभार, अजय सुतार व अनिकेत पाटील हे सर्वजण डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करत असताना त्यांना सदर पायवाटेलगत धामणी-मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
मृत बिबट्याचा पंचनामा : अमृत पन्हाळे यांनी याबाबतची खबर तात्काळ वन विभाग, तसेच प्रशासनास दिली. त्यांनतर पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी व्हानोळे यांनी तात्काळ घटनास्थळी येत मृत बिबट्याचा पंचनामा केला.
निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज : घटनेची माहिती मिळताच माजी वनरक्षक मुबारक मुल्ला व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्या सुमारे दीड वर्षांची मादी असून निमोनिया आजारामुळे तिचा बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे, पशुवैद्यकीय अधिकारी (ढेबेवाडी) व्हानोळे, वनरक्षक अमृत पन्हाळे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी, वनमजूर उपस्थित होते.