‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ विषयावरील परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांबाबत पोलीस व न्यायालय जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. सध्या पालक आपल्या कामांत व्यस्त झाल्याने त्यांचे मुलांकडे लक्ष नाही, हे दुर्दैव आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी असून महिला आणि मुलींनीही स्व:संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत, असे मत कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सामाजिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कराड नगरपालिका व छत्रपती शिवाजी उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ या विषयावरील परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : या परिसंवादास माई फौंडेशनच्या अध्यक्षा संगिता साळुंखे, प्रा. मेघा कुमठेकर, डॉ. गायत्री भोसेकर, शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी पवार, मानसोपचार तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रकाश दरूरे, इरफान सय्यद, पत्रकार प्रमोद तोडकर यांचे प्रमुख उपस्थिती होती. परिसंवादाचे सूत्रसंचालन अॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
मुलांमध्ये श्रद्धा, आदर कमी झालाय : अलिकडे मुलांमध्ये श्रद्धा, आदर कमी झाला असून मुले परीक्षार्थी बनली आहेत. पौगंडावस्था सुरू झाल्याने कल्लोळ सुरु होतो. हार्मोन्स काम करू लागतात, मुलांनी ठामपणे आणि विचारपूर्वक कृती केली पाहिजे. पालकांनी समुपदेशन केले पाहिजे. मुलांना अपयशही सांगितले पाहिजे. मुलांनी चांगले-वाईट आई-वडिलांशी शेअर केलेच पाहिजे. मारर्कार्थी विद्यार्थी यशस्वी ठरत नसतो. उत्तम चारित्र्य, उत्तम आरोग्य, पालकांशी संवाद या गोष्टी यशस्वीतेसाठी आवश्यक असतात, असे मत प्रा. मेघा कुमठेकर यांनी व्यक्त केले.
संगोपनाची सुरुवात गर्भाशयात होते : घरामध्ये जेवताना, वागताना मुलगा, मुलगी फरक केला जातो, इथेच मुलांमध्ये स्त्रियांबद्दल तुच्छता, कमीपणाची भावना निर्माण होते. खरेतर, संगोपनाची सुरुवात गर्भाशयात होते. म्हणून कुटुंबातच मुलींना बरोबरीने, सन्मानाने वागवले पाहिजे. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप व सुदृढ असायलाच हवा. अलिकडे मुलींच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून याबाबत पालकांनी जागृत राहावे, असे आवाहन संगीता साळुंखे यांनी केले.
पालकांचा मुलांशी नियमित संवाद असावा : नैतिकता या शब्दाचे हल्ली गांभीर्य राहिलेले नाही. प्रत्येकाने आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. मुले आई-वडिलांचे जग असतात. त्यामुळे पालकांचा मुलांशी नियमित संवाद असला पाहिजे. व्यक्तिमत्वाची सर्वांगीण प्रगती होणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने शाब्बासकी मिळवणे चांगले नाही. प्रत्येकाने दक्षतेने वागले पाहिजे, तरच इतरांनी असे वागावे, अशी अपेक्षा करु शकतो. नितिमूल्ले समाजात रुजली पाहिजेत. सृष्टी दृष्टीने बघायला पाहिजे. चांगले आरोग्य असेल, तर सौंदर्य आरोग्य संपन्न राहते. गुणांच्या आधारे आतून-बाहेरून सौंदर्य वाढते. समाजमान्य पेहराव असला पाहिजे. गुणसंपन्न सौंदर्याचा विकास झाला पाहिजे, असे मत डॉ. गायत्री भोसेकर यांनी व्यक्त केले.
एकत्र कुटुंबपद्धतीच योग्य : पुर्वीची एकत्र कुटुंबपद्धती होती, तीच योग्यच आहे. समाजातील या घटनांमुळे समाज अस्वस्थ बनला आहे. मुलांना संयमी करण्यासाठी निरोगी मन व स्वयंशिस्त पाहिजे. प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते, पण काही चुकांमुळे तिच्याकडून अपराध घडतो. ध्यान धारणनेच्या माध्यमातून मन निरोगी व सक्षम ठेवता येते, असे मत संजीवनी पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, प्रा. डॉ. प्रकाश दरूरे यांनी नैतिक मूल्यांबाबत मानसशास्त्रीय माहिती सांगितली. इरफान सय्यद यांनी संयम महत्वाचा असून स्वतःचे अधिकार स्वत:ला माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले. पत्रकार प्रमोद तोडकर यांनी प्रसार माध्यमांनी भूमिका काय असावी? याबाबत सविस्तर विवेचन केले. अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आभार मानले.
मोलाचे योगदान : हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी कराड नगरपरिषद कराड, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, विजय दिवस समारोह समिती, एनव्हायरी फ्रेंड्स नेचर ग्रुप, शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, सजग पालक मंच, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी सहयोगी संस्थानी परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.
या परिसंवादास सुपर अॅकॅडमी, कोटा अॅकॅडमी, पोतदार इंग्लिश मिडीयम, शिक्षण मंडळ, आयडिएल कोचिंग क्लासेस, एसटीसी अॅकॅडमी, जनकल्याण शिक्षण संस्था, चाटे क्लासेस आदी संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.