कराडला सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेला अहवाल या परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी सांगितले.
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दि. 2 ऑगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा केंद्रातर्फे आयोजित सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत माहिती देताना ते बोलत होते.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे संचालक मणीकंदा रामानुजम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, वानिकी महाविद्यालय, दापोलीचे अधिष्ठाता डॉ. सतिश नरखेडे, कृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे होते.
सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत बोलताना वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी म्हणाले, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात वावर असलेया वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती घेण्यासाठी ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने कोल्हापूर वन विभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात तब्बल 32 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. तसेच 10 हजार 785 चौकिमी क्षेत्रावर सह्याद्री-कोकण वन्यजी भ्रमणमार्गाचा विस्तार असून सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद या अहवालात करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या परिषदेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव भ्रमण मार्ग क्षेत्रात आजवर अधिवास, जैवविविधता विषयक झालेल्या संशोधनांना आणि वनविभागाला एका मंचावर एकत्र आणून व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदींविषयी उहापोह करण्यात आला.
परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयनाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी केले. परिषदेला सांगली उपवनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे, चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील, कोल्हापूर वनवृत्तमधील वरिष्ठ अधिकारी, सह्याद्री भुप्रदेशातील सर्व मानद वन्यजीव रक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, वन्यजीव संशोधक, निसर्गप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.
परिषदेत महत्त्वपूर्ण संशोधन सादर : या परिषदेदरम्यान संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदींविषयांवरील संशोधन सादर केले. तसेच या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व व भविष्यातील संशोधनाच्या संधींची चर्चा करण्यात आली. यासोबतच, वनगस्ती आणि वनसंरक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी, विविध सहभागीदारांचा सन्मानही करण्यात आला.
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा झाली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करून माहितीची देवाण-घेवाण केली जाईल.